ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची शुक्रवारी जळगावातील मुक्ताईनगर याठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. पण पोलिसांनी सुषमा अंधारे यांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे जळगावातील राजकीय वातावरण तापलं आहे. सभास्थळी जाण्यासाठी सुषमा अंधारे गाडीत बसल्या असता, जवळपास ५०० पोलिसांनी त्यांना अडवलं आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी स्वत: केला आहे. त्या ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
यावेळी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, सभास्थळी जाण्यासाठी मी गाडीत बसले आहे. मात्र, पोलिसांनी मला परवानगी नाकारली आहे. जवळपास पाचशे पोलिसांनी मला गराडा घातला आहे. माझ्याविरोधात दबावतंत्रांचा वापर वापर केला जात आहे. गुलाबराव पाटील माझ्यासोबत एवढं सूडाचं राजकारण का करत आहेत? हे अद्याप मला समजलं नाही.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “मला ताब्यात घेतलंय की नाही, हेही मला अजून माहीत नाही. नेमकी परिस्थिती काय आहे? हेही मला सांगितलं नाही. पोलिसांनी मला सभास्थळी जाण्यास मज्जाव केलाय, हे खरं आहे. पण मज्जाव का केलाय? याचं नेमकं कारण काय आहे, हेही मला कळालं नाही. आपल्या अटकेचं कारण विचारणं, हा आपला अधिकार आहे. पण मला ते कारण कळालं नाही. माझा दोष काय आहे? हेही मला सांगण्यात आलं नाही. महिला पोलीसही तैनात करण्यात आल्या आहेत. सर्व बाजुने मी नजरकैदेत आहे. मी काय दहशतवादी आहे का? किंवा मी गुंड आहे का?” असे सवालही सुषमा अंधारेंनी विचारले आहेत.