गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत. तर या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे ८ डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार सुरू केला आहे. दरम्यान काँग्रेसने ४३ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने काल(४ नोव्हेंबर) रोजी रात्री उशीरा ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने नवी दिल्लीत एआयसीसी मुख्यालयातील बैठक पार पडल्यानंतर ही पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी यादी जाहीर करताना सांगितले की, पुढे योग्य वेळी अन्य जागांवरील उमेदवारांची यादीही जाहीर केली जाईल. तर गुजरातमध्ये सत्ताधारी भाजपाकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
गुजरातमध्ये सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर काँग्रेसकडूनही पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धकांमध्ये आम आदमी पार्टीही या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहे. दरम्यान, आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सी व्होटर’ने घेतलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे.
या सर्वेक्षणात गुजरातमधील लोकांना विचारण्यात आलं की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर समाधानी आहात का? त्यावर ६५ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर समाधानी असल्याचं म्हटलं आहे. तर १५ टक्के लोकांनी पीएम मोदींच्या कामाला सरासरी काम म्हटलं आहे. दुसरीकडे, २० टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या कामावर असमाधानी असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता स्थापन होण्याचा संकेत मिळाले आहेत.