भुसावळ खाद्यभ्रमंती : 5 सर्वप्रथम आपणा सर्वाचे आभार ,आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल..जवळजवळ सर्वांनीच भुसाावळच्या खाण्याबद्दल अनेक सुचना केल्या ,त्या लेखात मी लिहीण्याचा प्रयत्न करतोय..वसंत टाँकिज आणि त्याच्या सभोवतालचा परिसर म्हणजे सुशेगात संध्याकाळ..टाँकिजच्या समोरच बाँम्बे चौपाटी ( बाँम्बे च मुंबई होण्याआधीचे हे दुकान) तिथली चमचमीत समोसे व कचोरी सोबत गोड चटणी छान असते..नगरपालिकेसमोरच एक राजस्थानी महाराज , पाव भाजी व पँटीसची गाडी लावायचा..दोन कोळशांच्या शेगडीवर शेगडीवर दोन तवे ,एकावर पाव भाजी तर एकावर पँटिस..पावभाजी रु.15/- तर पँटिस रु.10/- पण त्याचीसुध्दा जमवाजमव करतांना नाकीनऊ यायचे, पण एकदा का ती झाली कि सायकलवर टांग मारुन थेट हि गाडी गाठायची..हि शेगडीवरची पावभाजी खायला सोबत मात्र मित्र हवेतच..कारण त्याशिवाय मजा नाही..भाजी बरोबर पुदिन्याची पातळ हिरवी चटणी ,कांदा आणि लिंबु वर हिरवीगार कोथंबीरीची पखरण. . मोठी झकास चव…पँटिस तर अप्रतिम..पँटिस मँश करुन वर छोल्याची भाजी ,त्यावर पुदिन्याच्या चटणीचा हिरवागार शेला ,त्या शेल्याला चिंचेच्या चटणीची किनार..वर गोड मुळा किसुन टाकलेला ,तोंडात टाकल्यावर हे पँटिस विरघळायच..गाडीवरच खाण असल तरी तिथे अतिशय स्वच्छता असायची.. संध्याकाळी तिथ पेट्रोमँक्सचा दिवा लागायचा..त्या पिवळसर प्रकाशात मित्रांसोबत, तास दोन तास कसे निघुन जायचे कळायच देखील नाही.. तर अश्या त्या गाडीच नांव होत ” संगम पावभाजी ” ..तेच ..आत्ताच भुसाळमधील पावभाजीसाठीच फेमस नांव..आता त्यांच दुमजली हाँटेल आहे..व खाण्यासाठी वेटिंग असत..चटणीसहित सर्व पदार्थांची चव अजुनही बदललेली नाही. नगरपालिका शाळा क्र.5 ( नं.जाणकारांनी दुरुस्त करुन घ्यावा) समोर शामाप्रसाद उद्यान ,त्याला लागुनच एक हाँटेल होत आता आहे कि नाही ..माहीत नाही..तिथली मिसळ हि झटका मिसळ होती,लागुनच तहसीलदार कार्यालय असल्यामुळे सतत गर्दि असायची..उकडलेले मठ ,त्यावर पोहे व फरसाण वर लालभडक रस्सा ( कट) आणि न मागता त्यावर तर्री..एक मिसळ घेतली कि दिवसाचा कोटा फुल्ल.. आता त्या संपुर्ण भागाला चौपाटीच स्वरुप आलय..नाँव्हेल्टी आईसक्रिम,डोसा,पावभाजी,चायनीज, पाणीपुरी अश्या अनेक गाड्या तिथे लागतात..त्यातल्या नाँव्हेल्टिचा बदामशेक भन्नाट..उंच ग्लास तेवढ्याच उंचीचा त्यात चमचा ( भुसावळ : चम्मच ),कस्टर्ड घातलेल घट्ट दुध आणि भरपुर बदामाचे तुकडे, एका ग्लासात वैकुंठ..इथले गुलकंद,पिस्ता हे आईसक्रिमही तितक्याच चवीचे…ज्यांची गांधीचौकात पँटिसची गाडी असते त्यांचीच एक गाडी इथेसुध्दा आहे,त्यांचा मुलगा ती चालवतो ,चव तीच…त्याच्याकडचे दहिभल्ले व पाणीपुरी उत्तम..तिथुन थोडी वाट वाकडी केली कि दुसरी टाँकिज..” मामाजी टाँकिज “! त्या टाँकिजमधे पातालभैरवी नावाचा महाभयंकर सिनेमा,मित्रांच्या नादी लागुन पाहिल्याची भळभळती आठवण आहे..याच टाँकिजवळ घाशीलाल वडेवाले यांचे वड्यांचे दुकान आहे..नेहमीच्या वड्यांपेक्षा थोड जाडसर दळलेल्या पिठांचे हे कुरकुरीत वडे ..आतमध्ये तिखटजाळ असे बटाटा,पुदिना,कोथींबीर,हिरवी मिरचीचे सारण शिगोशिग भरलेले ..हे वडे म्हणजे एकप्रकारचा ब्रंचच म्हणा ना .यांनी त्यांची ब्रँच आमच्या नाशकातही उघडली आहे..पण चव तशी नाही मिळाली..असो..भेटुयात पुढच्या भागात..तोवर या ठिय्यांवर चक्कर मारुन या..
©सारंग जाधव