मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही बड्या नेत्यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे दोन वेगवेगळ्या मैदानावर दसरा मेळावे पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणाआधी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कटप्पा असा उल्लेख केला होता. त्यांच्या याच टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. “ते भाषणात मला कटप्पा म्हणाले. अरे कटप्पा पण स्वाभिमानी आणि प्रामाणिक होता. तुमच्यासारखा दुटप्पी राजकारणी नव्हता. आणखी काय म्हणालात? शिवसैनिकांना त्रास देताय? अरे असं बोगस काम आम्ही करणार नाहीत. आम्ही समोरुन वार करणारे आहोत. तुमच्यासारखे पाठीत खंजीर खुपसणारे नाहीत”, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिलं.
“तुम्ही तर तुमच्या उघड्या डोळ्यांनी आमचे शिवसैनिक जेलमध्ये गेले, तडीपार झाले, त्यांच्यावर मोक्का लागले, आनंद पवार अक्षरश: ढळाढळा रडले. त्यांचे अश्रू तुम्हाला नाही दिसले? आम्हाला काय सांगता? हे सरकार कुणावही अन्याय करणार नाही. मी जाहीरपणे पोलिसांना सांगू इच्छितो, आम्हाला कुणावरही अशाप्रकारचा अन्याय करुन पक्षामध्ये सामील करुन घ्यायचं नाही. आज एवढा लाखो लोकांचा जनसमुदाय हा साक्षी आहे. कोणी चूक केली आणि कोण बरोबर आहे, असले धंदे तुम्ही केले, आम्ही नाही करणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.