सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. बोगस बियाणे किंवा उगवण न होणारे बियाणे शेतकऱ्यांना विक्री झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
पालकमंत्र्यांनी खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा उपस्थित होते. जिल्ह्यात काही ठिकाणी विक्रेते शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विक्री करताना उगवण चाचणी करू याचा शिक्का मारण्यासह स्वाक्षरी घेऊन बियाण्यांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे विक्री होत असेल तर संबंधित उत्पादक कंपनीला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असे निर्देश बच्चू कडू यांनी दिले. जिल्ह्यात २९० शेतकरी गटांमार्फत ९०७० शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी निविष्ठा पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यात आतापर्यंत ३०८० क्विंटल बियाणे व १६२० मेट्रिक टन खते पोहोचवण्यात आले आहेत.