अभिनेत्री मनवा नाईकशी गैरवर्तन करणं कॅब चालकाला भोवले, २४ तासांच्या आत पोलिसांकडून बेड्या

अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी ओळख असलेल्या मनवा नाईकने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नीची सोयराबाई मोहिते ही भूमिका साकारली होती. नुकतंच मनवा नाईकबरोबर एका कॅब चालकाने गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. तिने स्वत: पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे.

मनवा नाईकने फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यानंतर वांद्रा कुर्ला संकुल परिसरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी त्या कॅब चालकाचा शोध घेतला असून त्याला अटक केली आहे. मोहम्मद मुराद आझम अली असे या कॅब चालकाचे नाव आहे. तो २४ वर्षांचा असून अँटॉप हिल परिसरात राहणारा रहिवाशी आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर त्याची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ५०६ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालवताना फोनवर बोलणे आणि सिग्नल जंप केल्याबद्दल मोटार वाहन कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली असून आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मनवा नाईकचा ही उबर टॅक्सीद्वारे घरी जात असताना कॅब चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले. तिला धमकीही दिली होती. या प्रकारानंतर मनवा नाईकने सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केली होती. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी या कॅब चालकावर लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.