राजकारण्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांनी बासनात गुंडाळून ठेवलेले प्रतिबंधक नियम, जिल्ह्यात कोरोना निर्बंध लागू करण्यात केलेला चालढकलपणा, नाशिकमध्ये पर्यटनासाठी नागरिकांनी केलेली गर्दी या साऱ्याचा एकत्रित परिणाम पाहता अखेर झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. आज घडीला शहरातील कोरोना रुग्णसंख्या दहा हजारांच्या घरात पोहचलीय. हे पाहता जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, तब्बल तीन महिन्यांपू्र्वी बंद केलेले 16 कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत.
राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात 12 ते 15 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीत व्यक्त केली होती. तितक्या प्रमाणात नाही, मात्र तरीही या काळात कोरोना रुग्ण वाढले. ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. त्यात नाशिक जिल्हा रुग्णालय, मालेगाव जिल्हा रुग्णालय, पिंपळगाव रुग्णालयासोबतच कळवण, नांदगाव, येवला, इगतपुरी, वणी, सुरगाणा, पेठ येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी 1800 खाटांची संख्या उपलब्ध आहे. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे.
येणाऱ्या काळात जवळपास 85 टक्के लोक गृहविलगीकरणात राहण्याची शक्यता गृहीत धरली आहे. मात्र, तरीही 15 टक्के लोक रुग्णालयात येऊ शकतात. त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. हे पाहता प्रशासन कामाला लागले आहे. त्यात सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात 7 हजार 535, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 182 तर जिल्ह्याबाहेरील 369 रुग्ण आहेत. त्यात नाशिक ग्रामीणमध्ये 114, बागलाण 34, चांदवड 19, देवळा 16, दिंडोरी 131, इगतपुरी 55, कळवण 50, मालेगाव 43, नांदगाव 130, निफाड 434, पेठ 4, सिन्नर 112, सुरगाणा 20, त्र्यंबकेश्वर 21, येवला 29 असे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हे पाहता प्रशासन पुन्हा कामाला लागले आहे.
नाशिकमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रांगा लावाव्या लागल्या. वणवण फिरावे लागले. हे पाहता या लाटेत कसलाही त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट पालिकेने उभारल्याची माहिती स्वतः महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. त्यामुळे केवळ 13 मेट्रीक टन ऑक्सिजनची क्षमतेवरून पालिकेने तब्बल 3 कोटी रुपये खर्चून 140 मेट्रीक टन क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटपर्यंत मजल मारली आहे.