सलमान खान आणि कतरिना कैफ ही बॉलिवूडची आणि ऑन-स्क्रीन सर्वाची आवडती जोडी आहे. या दोघांनी ‘मैंने क्यूं प्यार किया’, ‘युवराज’, ‘एक था टाइगर’, ‘भारत’ आणि ‘टाइगर जिंदा है’ सारख्या सिनेमांमध्ये आपल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली. आता सलमान आणि कतरिना पुन्हा एकदा त्यांच्या आगामी ‘टायगर 3’ चित्रपटाच्या चर्चेत आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे ‘टायगर 3’ या चित्रपटाचं शूटिंग थांबविण्यात आलं होतं आणि आता चित्रपटाचं शूटिंग पुन्हा रुळावर आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार सलमान आणि कतरिना या महिन्यात पुन्हा शुटिंगला सुरूवात करणार आहेत. ही जोडी 23 जुलैपासून मुंबईत शूटिंगला प्रारंभ करणार आहे. इतकंच नाही तर निर्मात्यांनी ऑगस्टसाठी अंतर्राष्ट्रीय कार्यक्रम निश्चित केला आहे. असं म्हटलं जातं की, निर्माता आदित्य चोप्राने यानंतर पुन्हा शूटिंग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. दिग्दर्शक मनीष शर्मा आधीच सलमान, कतरिना आणि इमरान हाश्मीसोबत शूटिंगवर परत येण्याची तयारी करत आहेत.
एका वृत्तानुसार, चित्रपटाच्या शूटचे पहिले काही दिवस फक्त सेटवरच मुख्य कलाकारच उपस्थित असतील. या अहवालात असंही म्हटलं आहे की, या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारे सलमान आणि कतरिनासोबत इमरान हाश्मी शूटसाठी सामील होणार आहे. ‘टायगर 3’साठी सलमान खान आणि कतरिना कैफ अविनाश आणि झोया या भूमिका साकारणार आहेत.