सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. आता सायबर ठगांनी वीज ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. वीज विभागाचे कर्मचारी बनून ते आता लोकांची बँक खाती रिकामी करत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नांदेडमधून समोर आली आहे.
काय आहे घटना?
नांदेडमध्ये विजेचे बिल थकल्याचे सांगत सहा लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भामट्याने महावितरणच्या नावाने निवृत्त अभियंत्याला फसवले आहे. गौतम मारोती भावे असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त अभियंता यांचे नाव आहे. गौतम भावे यांना 27 मे रोजी त्यांच्या मोबाईलवर एक फोन आला होता. त्यावेळी तुमचे महावितरणचे 450 रुपये बिल बाकी आहे, असे कॉलवरील व्यक्तीने त्यांना सांगितले. यावर भावे यांनी बिल भरायला सहमती दर्शवली. यानंतर भावे यांना योनो अॅपच्या माध्यमातून 100 रुपये देण्याची सूचना करण्यात आली.
भावे यांनी त्यानुसार 100 रुपये भरले. मात्र, यानंतर पुढे एक धक्कादायक प्रकार घडला. त्यांना एक लिंक देण्यात आली. तसेच ती लिंक उघडायला त्यांना सांगण्यात आले. तसेच यावेळी तुमचा मोबाईल चालू ठेवा, आम्ही तुमचे पूर्ण काम करुन देतो, असेही त्यांना सांगण्यात आले. याचवेळी या भामट्याने डाव साधला. त्याने गौतम मारोती भावे यांच्या मोबाईलचा डाटा अॅक्सेस केला आणि त्यांच्या बँक खात्यातून तब्बल सहा लाख रुपये वळवले.
गौतम भावे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी 2 जूनला भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गौतम मारोती भावे यांना 9062388932 या आणि आणखी एका दुसऱ्या मोबाईलवरुन फोन आला होता. त्यादिशेने या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक भारती वाठोरे करत आहेत.