‘The Kerala Story’वरची बंदी हटवली, सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले
द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशातील काही राज्यांनी टॅक्स फ्री केला तर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली. पश्चिम बंगाल सरकारने घातलेल्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ही बंदी हटवली. अशा प्रकारे बंदी घातली तर खेळ आणि कार्टून सोडलं तर कशावरही बंदी घातली जाईल असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं की, कायदा आणि सुव्यवस्था राखणं सरकारचं कर्तव्य आहे. यासाठी राज्याची सकारात्मक अशी जबाबदारी आहे. तुम्ही अशा प्रकारे समाजातील कोणत्याही लोकांना निवडू शकता आणि ते कशावरही बंदी घाला म्हणतील. खेळ किंवा कार्टून वगळता इतर कशावरही बंदी घालू शकतील.नियमांचा वापर हा जनतेच्या सहनशीलतेवर करता येऊ शकत नाही. अन्यथा सर्व चित्रपट केरल स्टोरीच्या जागी असतील.
राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर
राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर गेली आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मितीकडून १० हजार मे.वॅ.हून अधिक वीज निर्मिती केली जात आहे.महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन यांनी उन्हाळ्यात विजेच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन ‘मिशन औष्णिक ८००० मेगावॅट’ चे उद्दिष्ट निश्चित केले होते. राज्यात यावर्षी एप्रिल महिन्यात विजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. मे महिन्यात ती २८हजार मेगावॅटवर गेली. पुढच्या काही दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मितीने सर्व संसाधनांचे नियोजन केले. १७ मे २०२३ रोजी रात्री ७.४५ वाजता एकूण १० हजार ७० मेगावाट वीज निर्मितीचा पल्ला गाठला. यापूर्वी १७ मार्च रोजी रात्री ८ वाजता १० हजार १०२ मेगावॅट वीज निर्मितीचा उच्चांक गाठला होता. सध्या महानिर्मितीच्या सर्व संचांतून वीजनिर्मिती सुरू आहे. त्यामुळे विजेची वाढीव गरज भागवण्यास मदत होत असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.
नवी मुंबईत स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा; त्याच भिंतींना पुन्हा रंग
नवी मुंबई स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, याच स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असल्याचे दिसत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई शहराला आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक भिंतीला आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. मात्र, या कामाचे ठेके अधिकृत निघाले नसल्याचे समोर आले आहे, अनेक कामे ठेक्याशिवाय दिले असून केवळ तांत्रिक बाबींच्या आधारे कामे सुरू आहेत. त्यामुळे या कामात पारदर्शकता दिसत नाही. केवळ शहराला आकर्षक दिसण्यासाठी रंगरंगोटीवर करोडो रुपयांचा चुराडा करणे कितपत योग्य आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
वर्ध्यात चाललंय काय? 2 वर्षांत तब्बल 50 बालविवाह रोखले
बालविवाह ही मोठी सामाजिक समस्या आहे. मुलीच्या लग्नाची किमान वयोमर्यादा 18 वरून 21 वर्षे करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागात बालविवाहाच्या संख्येत भर पडत आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या बालविवाहांची आकडेवारी लक्षात घेता वर्धा जिल्हा प्रशासन आणि काही सामाजिक संस्था ते रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात 2020 पासून आजपर्यंत 50 बालविवाह रोखण्यात जिल्हा यंत्रणेला यश आलं आहे.वर्ध्यात अवैधरित्या होणारे बालविवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे, यासाठी हेल्पलाइन, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरित्या काम केले. त्यामुळे बालविवाह रोखण्यात य़श मिळाले आहे. जिल्ह्यात मार्च 2020 पासून 10 मे 2023 पर्यंत एकूण 50 बालविवाह रोखले आहेत. जानेवारी 2022 पासून एप्रिलअखेर 5 बालविवाह रोखले. त्यात जानेवारी एक, फेब्रुवारी 3 तर मार्चमध्ये एक बालविवाह चाईल्डलाईनकडून रोखण्यात आला. तसेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावरही पथकाने बालविवाह रोखले.
…तरच तुळजाभवानीचं दर्शन घेता येणार, मंदिर प्रवेशासाठी नवी अट!
तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिर प्रशासनाने नवीन अट घातली आहे. तुळजाभवानी मंदिरात आता अंगप्रदर्शन करणारे वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर परिसरात याबाबतचे फलक लावले असून त्याची अंमलबजावणी तात्काळ सुरू केली आहे. भारतीय संस्कृतीचा हवाला देत मंदिर संस्थान हा निर्णय घेतला असून या निर्णयावर पुजारी आणि भाविक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ म्हणून ओळखले जाणाऱ्या तुळजाभवानीच्या मंदिरात आता पारंपारिक कपडे घालूनच प्रवेश मिळणार आहे. वेस्टर्न कपडे, अंग प्रदर्शन करणारे कपडे तसेच बरमुडा घालून भाविकांना प्रवेश करता येणार नाही. या निर्णयाचे फलक आता मंदिर संस्थानाने मंदिर आणि आवाराच्या परिसरात लावले आहेत. अचानक मंदिर संस्थांनाने घेतलेल्या या निर्णयाचे पुजारी स्वागत करत आहेत, तर भाविक मात्र यावर समिश्र प्रतिक्रिया देत आहेत.
निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे एक दिवस अगोदर होणार प्रस्थान
आषाढी एकादशीनिमित्त संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून येत्या 2 जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. एक दिवस अगोदर पालखी प्रस्थान करणार आहे. एकूण 28 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडणार आहे. यामुळे शेकडो भाविक या सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र ही वारकरी संतांच्या विचारांची भूमी आहे. वारकरी संतांनी संत वाङ्मयातून या महाराष्ट्राला भगवान पांडुरंगाच्या सगुण उपासनेचे अनेक मार्ग दाखवले आहेत. त्यात पंढरपूरची पायी वारी ही मुख्य उपासना आहे. माझ्या जीवीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी, प्रती वर्षी आषाढी वारीला भगवान पांडुरंगाच्या भेटीसाठी महाराष्ट्रातून अनेक संत महात्म्यांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात.
एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन
एसटी महामंडळाची पहिली बस नगर ते पुणे अशी १ जून १९४८ रोजी धावली. या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांचे काल, बुधवारी रात्री नगर शहरातील माळीवाडा भागातील राहत्या घरी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. एसटी महामंडळाच्या धावलेल्या पहिल्या बसचे वाहक ते गेल्यावर्षी धावलेल्या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटक अशा तब्बल ७५ वर्षांचे साक्षीदार लक्ष्मण केवटे होते.आज, गुरुवारी सकाळी नगर शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एसटी महामंडळाच्या वतीने विभागीय नियंत्रक मनीषा सपकाळे तसेच महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली अर्पण केली. नगर जिल्ह्यातील सर्व आगारातून लक्ष्मण केवटे या पहिल्या वाहकाला श्रद्धांजली अर्पण करणारे फलक लावण्यात आले आहेत.
…अन् ५३५ कोटींची रोकड घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यात बंद पडला; पोलिसांची उडाली धांदल
तामिळनाडूतील चेन्नईमध्ये ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा ट्रक भररस्त्यात बंद पडल्याची घटना समोर आली आहे. संबंधित ट्रक आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेचे पैसे घेऊन जात होता. यावेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हा ट्रक भररस्त्यात बंद पडला. त्यामुळे या ट्रकबरोबर ५३५ कोटी रुपये घेऊन जाणारा अन्य एक ट्रकही थांबवला. हा प्रकार घडल्यानंतर संबंधित पैशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलीस पथकाची धांदल उडाली.हा ट्रक बंद पडताच खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक पोलिसांना सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आलं. एकूण १०७० कोटी रुपयांची रोकड घेऊन जाणारे दोन ट्रक अशाप्रकारे चेन्नईच्या रस्त्यावर थांबल्याने चर्चांना उधाण आलं आहे. संबंधित दोन ट्रक चेन्नईतील तांबरम परिसरात उभे होते.
SD Social Media
9850 60 3590