एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात

मुंबईच्या दादरजवळच्या माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ मोठी घटना घडली आहे. एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन एक्सप्रेस गाड्या समोर आल्याने अपघात झाला आहे. मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर हा सर्व प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर गदग एक्सप्रेस- पाँडेचरी एक्सप्रेस आमनेसामने आल्या आहेत.

या अपघातात एक्सप्रेस गाडीचे 3 डब्बे घसरले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणत्याही घातपाताची माहिती अजूनही समोर आलेली नाही. या सर्व प्रकारामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ऐन घरी जाण्याची वेळी हा सर्व प्रकार घडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.

“या अपघातात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणाला दुखापतही झालेली नाही. दादरवरुन पाँडेचरीच्या दिशेने 11005 या क्रमांकाची एक्सप्रेस निघाली. या एक्सप्रेसच्या मागे सीएसएमटी-गडक ही एक्सप्रेस गाडी होती. या एक्सप्रेसच्या लोको पायलटने पाँडेचरी एक्सप्रेसच्या मागील डब्ब्यांना धडक दिली. या धडकेत 3 डब्बे घसरले”, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

मध्य रेल्वेची वाहतूक केव्हापर्यंत पूर्वपदावर येणार?
“डाऊन फास्ट आणि अप फास्ट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच धिम्या मार्गावरील गाड्यांचा विद्युत पुरवठा हा सुरक्षेच्या दृष्टीने खंडीत केला होता. तो पुरवठा पुन्हा पूर्वपदावर आणून अडकलेल्या प्रवाशांची घरी जाण्याची सोय करणार आहोत”, असं शिवाजी सूतार यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.