आज दि.१५ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ
राहिला पाहिजे : शरद पवार

राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. आज जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केलं. एखादा राजकारणी टोकाची भूमिका घेऊन जात असेल त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन द्यावं ही भूमिका घेतली तर ती काळजी करण्यासारखं आहे. या सगळ्या कार्यक्रमामुळे समाजात सामाजिक ऐक्य संकटात येईल की काय याची चिंता वाटते, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. काही झालं तरी महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, सर्व धर्म जाती भाषा यांच्यात सामंज्यस असलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे .

मुस्लीम भागात १३ वा स्फोट झाल्याचं
आपण सांगितलं कारण : शरद पवार

देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आकडेवारी खरी असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. “मुंबईच्या बॉम्बस्फोटांची माहिती देताना १२ स्फोट झालेले असताना १३ ठिकाणी झाल्याचं मी सांगितल्याचं ते म्हणाले आहेत. मुस्लीम भागाचं नाव घेतल्याचंही सांगितलं. ते १०० टक्के खरं आहे. हे मी केलं”, असं शरद पवार म्हणाले आहेत.१२ ऐवजी मुस्लीम भागात १३वा स्फोट झाल्याचं आपण का सांगितलं याचं कारण देखील पवारांनी यावेळी दिलं आहे. “ज्या १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले, ती हिंदुंची ठिकाणं होती. हा स्फोट कुणी केला? त्याचा शोध मी घेतला. त्यासाठी जे साहित्य वापरलं, ते मी स्वत: जाऊन बघितलं. जो पहिला बॉम्बस्फोट झाला, ते साहित्य मी पाहिलं. ते हिंदुस्थानात तयार होत नाही, ते कराचीत तयार होतं हे मला माहिती होतं. याचा अर्थ त्यामागे बाहेरची शक्ती होती. त्यामुळे कुणीतरी शेजारचा देश हिंदू-मुस्लिमांमध्ये वाद वाढवायचं काम आणि मुंबईत आग लागावी अशा प्रयत्नात होता.

‘पुरंदरेंनी जेम्स लेनचं शिवअभ्यास म्हणून कौतुक केलं होतं’, पवारांनी पुराव्यासह राज ठाकरेंचे उपटले कान

‘जेम्स लेननं जिजामातांबद्दल अत्यंत गलिच्छ लिहिले होते. त्यांचं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी सोलापूरच्या सभेत केलं होतं. एवढंच नाहीतर शिवजयंती तारखेनुसार करावी की तिथीनुसार याबद्दल माफी मागितली होती’ असं पुराव्यानिशी वाचून दाखवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कान उपटले आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जळगावच्या दौऱ्यावर आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मनसेच्या पत्राच्या शरद पवारांनी केराची टोपली दाखवत राज ठाकरेंची चांगलीच कानउघडणी केली.

देशात कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका वाढला?, केंद्र सरकार निर्बंधांची घोषणा करण्याची शक्यता

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. आठवडाभरातच कोरोनाचे रुग्ण 150 वरून 300 च्या पुढे गेले आहेत. या संदर्भात, दिल्लीत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांचा वेग आठवडाभरात दुप्पट झाला आहे. दरम्यान, गुरुवारी दिल्लीत 325 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर एकही मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुढील आठवड्यात 20 एप्रिल रोजी एक महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत दिल्लीतील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि मास्क न लावल्यास होणारा दंड यावर चर्चा होणार आहे.

ठाकरे सरकारचा आणखी एक
घोटाळा उघड करणार : किरीट सोमय्या

किरीट सोमय्या यांनी १५ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली होती. यावेळी ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, त्यांचे कौटुंबिक मित्र, हवाला ऑपरेटर असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदीला आपण कुठे लपवले आहे त्याची माहिती जनतेला द्यावी. ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यासोबतचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. मी तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. ते नंदकिशोर चतुर्वेदी यांना शोधत आहेत. त्यामुळे नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करण्यात यावे ही आमची मागणी आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना
१८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

२०२० साली गुणरत्न सदावर्ते यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजी छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील अंजुम पठाण यांनी पोलिसांची बाजू मांडली. यावेळी पोलिसांनी वृत्त वाहिनीच्या चर्चा सत्रात केलेले वक्तव्य हे कोणाच्या सांगण्यावरून केले आहे. त्याची चौकशी करणे आणि आवाजाची तपासणी यासाठी पोलिसांनी १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली.

माझा रामावर विश्वास नाही : माजी
मुख्यमंत्री जीतन राम मांझी

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जमुई जिल्ह्यामधील सिकंदरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर भाषणामध्ये मांझी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. मांझी यांनी भाषणामध्ये प्रभू श्री रामचंद्रांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. भगवान रामचंद्र काही देव नाही ते केवळ एक पात्र होतं, माझा रामावर विश्वास नाही, असं वक्तव्य मांझी यांनी केलं

गायिका आशा भोसले यांचे सुपूत्र
आनंद भोसले रुग्णालयात दाखल

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे सुपूत्र आनंद भोसले यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी आनंद अचानक जमिनीवर पडले आणि त्यानंतर त्यांना काही जखमा झाल्या होत्या. तर मिळालेल्या माहितीनुसार आनंद हे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते. आनंद यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याने त्यांना जनरल वार्डमध्ये हलविण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा आशा भोसले याही दुबईत होत्या आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

इन्फोसिस मधून नोकरी सोडणाऱ्या
कर्मचाऱ्यांची संख्या वाढली

आयटी क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिस या कंपनीमध्ये नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दर तिमाहीतल्या आकड्यांवर नजर टाकल्यास लक्षात येईल की यामध्ये मोठे बदल झाले आहेत. आयटी कंपन्या हुशार आणि कर्तबगार कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.

अरुणाचल प्रदेशमध्ये भुकंपाचा
मोठा धक्का जाणवला

अरुणाचल प्रदेशमध्ये भुकंपाचा मोठा धक्का जाणवला. सकाळी 6.56 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील Panginच्या उत्तरेला होता. भूकंपामुळे काही भागातील घरांची काही प्रमाणात पडझड झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे.

…नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा वाचणार, रवी राणांचा इशारा

सध्या राज्यामध्ये हनुमान चालीसा व भोंगा यावरून मोठा वाद सुरू असताना या वादामध्ये युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांनी सुद्धा उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचणार असा इशाराचा आमदार रवी राणा यांनी दिला.
दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील एका हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसाचे वाचन केलेलं होते, तर आता अमरावतीत हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे अमरावती येथील बगडीवाली हनुमान मंदिरात सकाळी 9 ते 11 वेळात हनुमान चालीसाचे पठण करणार आहे. स्वतः मंदिरावर भोंगे चढवणार तसंच ज्या मंदिरावर भोंगे नाहीत त्यांना मोफत भोंगे सुद्धा देणार अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.