पंजाबचे माजी मुख्यमंत्री चन्नी यांची ईडीतर्फे सहा तास चौकशी

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) सहा तास चौकशी करण्यात आली. वाळू उत्खननाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही चौकशी झाल्याचे समजते. ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) ५९ वर्षीय कॉंग्रेस नेते चन्नी यांची चौकशी केली. बुधवारी रात्री उशिरा ईडी विभागीय कार्यालयातून ते बाहेर पडले.

ईडीतर्फे वाळू उत्खननप्रकणी आपल्याला चौकशीसाठी बोलावल्याची माहिती चन्नी यांनी ट्विटमध्ये दिली होती. त्यांनी नमूद केले, की आपल्याला जेवढी माहिती होती तेवढी सर्व आपण ईडीला दिली आहे. न्यायालयात ईडीने या प्रकरणातील चलन याआधीच सादर केले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी बोलावलेले नाही.

चन्नी यांचे पुतणे भुपिंदरसिंग ऊर्फ हनी यांना या प्रकरणी पंजाब विधानसभा निवडणुकीआधी २० फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह इतरांविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याविषयक विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हनी हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

चन्नी यांनी याआधी ईडीच्या नोटिसांना जुमानले नव्हते. ईडीने त्यांचे हनी यांच्यासह इतरांशी असलेल्या व्यवहाराविषयी, तसेच त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात हनी त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला आले होते, या संदर्भातही ईडीने चन्नी यांच्याकडे चौकशी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.