राज्यभरात पावसाने धुमशान घातले आहे. ठिकठिकाणी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशा परिस्थितीत दरडी, जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहे. नागपूरमध्ये हनुमान मंदिर जमीनदोस्त झाले आहे. जुने झालेले हे मंदिर अवघ्या काही सेकंदात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.
नागपूरमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने नागपूरच्या नदी-नाल्यांना पूर आला आहे. मागच्या आठ दिवसापासून सतत होणाऱ्या पावसामुळे नागपूरच्या इतवारी भागातील पुरातन हनुमान मंदिर कोसळले. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना आहे.लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर पावसामुळे जिर्ण झाले होते. या मंदिराच्या भिंती भुसभुशीत झाल्या होत्या. त्यामुळे मंदिराची इमारत कधीही कोसळले अशी भीती होती. त्यामुळे या मंदिरात कुणीही थांबलेले नव्हते. अखेरीस ज्याची भिती होती तेच झालं. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास मंदिर एका बाजूला झुकले. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी तिथे जमा झाली होती. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात मंदिर हे जमीनदोस्त झाली. मंदिर जमीनदोस्त झाल्यानंतर उपस्थितीत लोकांना जय हनुमान अशा घोषणाच हनुमानाला नमस्कार घातला.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीविताहानी झाली नाही. मात्र सततच्या पावसाने जुन्या इमारती कशा जरजर झाल्या हे या घटनेतून परत एकदा अधोरेखित होते. मंदिराचे ढिगार बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच या ठिकाणी नव्याने मंदिर उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.