अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घटलीये. गाडीला अपघात झाला असला तरी त्या सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वत : फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.
अपघातानंतर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी फेसबुक पोस्ट लिहित या अपघाताची माहिती दिली आहे. किशोरी शहाणे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, “आमच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात आमच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने आमचा जीव वाचलाय देवाच्या आशिर्वादाने आम्ही सुखरूप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई…” असं त्यांनी म्हटलं आहे.
अपघाताबद्दल सविस्तर सांगायचं झाल्यास किशोरी शहाणे या एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र किशोरी शहाणे यांची फेसबुक पोस्टमधले फोटो पाहता त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. किशोरी शहाणे मात्र या अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत.
किशोरी शहाणे या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमे सिनेसृष्टीला दिले. माहेरची साडी त्यांचा सिनेमा खूप गाजला. अलिकडेच आलेला त्यांचा क्लासमेट सिनेमाही गाजला. त्या मराठी बिग बॉसमध्येही सहभागी झाल्या होत्या.