वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता किंवा जंगलातील इतर कोणताही प्राणी जो आपल्याला एरवी दिसत नाही, त्या प्राण्याला प्रत्यक्षात पाहायला कुणाला आवडणार नाही. यासाठी आपण जंगल सफारी, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहालयात जातो. पण तरी थेट प्राण्यांसमोर जाण्याची आपली हिंमत होणार नाही. पण दोन तरुणांनी तशी हिंमत केली. ते थेट प्राण्यांसारखे कपडे घालून प्राण्यांच्या कळपात गेले खरे. पण तेव्हाच सिंहांच्या तावडीत सापडले. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे.
व्हिडीओत पाहू शकता झेब्रासारखे कपडे घालून दोन तरुण चालताना दिसतात. एक तरुण पुढे आहे आणि एक मागे. तिथंच झेब्राचा कळप आहे, दोघंही झेब्राच्या कळपात घुसतात. त्यानंतर मध्येच एकटे चालताना दिसतात. त्याचवेळी सिंहांचा कळप झेब्राची शिकार करायला येतो. तरुण हळूहळू चालत असतात त्यामुळे सिंहांचं लक्ष त्यांच्यावर जास्त असतं.
सिंहांना पाहून सर्व झेब्रा पळू लागतात. झेब्राच्या कपड्यांमध्ये असलेले हे दोन्ही तरुणही पळू लागतात. पण त्यांना तितक्या वेगाने पळणं शक्य होत नाही. सिंह वेगाने धावत त्यांना पकडतात. दोघंही सिंहांच्या तावडीत सापडतात. सिंह त्यांच्यावर हल्ला करतात. झेब्राच्या मागच्या बाजूला चावण्याचा प्रयत्न करतात. त्याचवेळी दोघंही तरुण खाली बसतात.
सिंह त्यांना झेब्रा समजून त्यांची कातडी फाडण्याचा प्रयत्न करतात. पण ते कापड असल्याने सिंहांच्या नखांनी, दातांनी काही ते ओरबडलं जात नाही. कसाबसा एक तरुण आधीच त्यातून बाहेर पडून जातो. नंतर एक तरुण आपलं डोक्यातील झेब्राचं डोकं काढतो आणि सिंहाकडे फेकतो. सिंह ते डोकं उचलतो आणि तिथून निघून जातो. सिंहालाही तो खरा झेब्रा आणि त्याच झेब्र्याचं डोकं मिळालं असं वाटतं.
@closecalls7 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अवघ्या 36 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. शेवटच्या 16 सेकंदामध्ये सिंहांनी तरुणांवर केलेला हल्ला दिसून येतो. या तरुणांचं नशीब चांगलं म्हणून ते सिंहाची शिकार होता होता वाचले आणि सिंहांनी त्यांना फाडून टाकलं असतं. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो.