अनिल देशमुख प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार

अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात सीबीआय शुक्ला यांना साक्षीदार करणार आहे. हैदराबादमध्ये रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला.

सीबीआयने याआधी अनिल देशमुख, त्यांचे दोन पीए संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचे जबाब नोंदवले आहेत. तर निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि त्याच्या दोन वाहन चालकांसह अनेकांचे जबाब रेकॉर्ड करण्यात आले आहेत. 21 एप्रिलला रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्याची माहिती आहे.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकासआघाडीचा ‘कार्यक्रम’ उरकून टाकला, असे वक्तव्य भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केले होते. हैदाराबादमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावं उघड केल्याचा गौप्यस्फोट अतुल भातखळकर यांनी केला.

भातखळकर यांनी बुधवारी यासंदर्भात ट्विट करुन भाष्य केले होते. त्यामध्ये रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव घेतल्याचा दावा भातखळकर यांनी केला होता.
एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी बुधवार 28 एप्रिल रोजी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांना सध्या चौकशीला येऊ शकणार नसल्याचं कळवलं आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचं उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या समन्सला दिलं.

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.