“कर्नाटकात भाजपाला ऑपरेशन लोटसची संधीच मिळणार नाही, कारण…”, नाना पटोलेंचं विधान
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो, हा जनतेला विश्वास आहे. भाजपाला कर्नाटकात नॅनो कारमध्ये बसावे लागेल अशी होईल, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रामेश्वरम, तिरुपती, श्री शैलमचे दर्शन सुलभ; रेल्वेची ‘दक्षिण भारत शुभ यात्रा’ स्पेशल ट्रेन
महाराष्ट्र व छत्तीसगड या राज्यातील यात्रा करण्यास इच्छूक असणाऱ्यांना दक्षिण मध्य पूर्व रेल्वे विभागाने विशेष सोय दिली आहे. विलासपूर ते रामेश्वरम् या दरम्यान दक्षिण भारत शुभ यात्रा ही विशेष गाडी धावणार आहे.पंचवीस मे रोजी यात्रा शुभारंभ विलासपूर येथून होणार आहे. या स्थानकासह भाटापारा, नेवरा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोडा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम व बल्लारशा या स्थानकांतून पर्यटक घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर रामेश्वरम्, मदुराई, तिरुपती व मरकपूर येथे थांबे राहणार. या स्थानक परिसरातील श्री शैलम, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग व अन्य स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
शिंदे गटातील ‘ते’ १६ आमदार अपात्र ठरणार?
शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं यासंदर्भात निवडणूक आयोगानं आधीच निर्णय दिला आहे. त्यानुसार ते शिंदे गटाला मिळालं आहे. मात्र, आता शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे यात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात प्रदीर्घ काळ सुनावणी झाल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.येत्या १६ तारखेला न्यायमूर्ती शाह निवृत्त होत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीच्या खंडपीठामध्ये शाह यांचाही समावेश होता. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधीच या प्रकरणाचा निकाल लागणं अपेक्षित आहे. येत्या १३ मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे त्याआधीच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये ११ किंवा १२ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल, असा दावा केला आहे.
“माझा दोनदा हत्येचा प्रयत्न झाला”; अटकेआधी इम्रान खानची प्रतिक्रिया
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. इस्लामाबाद न्यायालयाबाहेर ही कारवाई करण्यात आली. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणी न्यायालयात हजर राहिल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. यापूर्वी मार्चमध्येच इम्रान खान यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलीस प्रशासनाला यश आलं नव्हतं.आज मंगळवारी इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात सुनावणीसाठी हजर झाले होते. यावेळी पाकिस्तानी रेंजर्संच्या तुकडीने त्यांना अटक केली. त्यांना अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या अटकेचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, इम्रान खान यांचा अटकेआधीचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एका इंटेलिजन्स अधिकाऱ्याने माझी हत्या करण्याचा दोन वेळा प्रयत्न केला, असा दावा इम्रान खान यांनी संबंधित व्हिडीओत केला आहे.
‘आफताबनेच केली श्रद्धाची हत्या’ दिल्ली न्यायालयाकडून आरोप निश्चित
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब पूनावालाच्या विरोधात दिल्लीच्या साकेत न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा निश्चित केला आहे. तसंच कलम २०१ अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचाही आरोप निश्चित केला आहे. आफताब पूनावालाने त्याची लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने दिल्लीच्या महारौलीच्या जंगलात आणि इतर भागांमध्ये फेकले होते. काही तुकडे त्याने ग्राईंडरमध्ये बारीक केले होते आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याला नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आली.दिल्लीतल्या साकेत न्यायालयाने आफताबवर आरोप निश्चित केले. आफताबच्या विरोधात हत्येचा आणि हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट केल्याचा खटला चालणार आहे. अशात आफताबने हे आरोप फेटाळले आहेत आणि मी खटल्याला सामोरा जाईन असं म्हटलं आहे. हे आरोप मला अमान्य आहेत असं आफताब पूनावालाने म्हटलं आहे.
१७०० घरांची राखरांगोळी, ६० जणांचा मृत्यू… मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता!
मणिपूरमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचाराची घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाला असून १७०० घरे जाळण्यात आल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एस. बिरेन सिंह यांनी दिली आहे. तसेच मणिपूरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेतून आणल्यानंतर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात ठेवलेल्या चित्त्यांपैकी आणखी एकाचा मंगळवारी ( ९ मे ) मृत्यू झाला. चित्त्यांमध्ये झालेल्या झुंजीत ‘दक्षा’ या मादीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ‘दक्षा’सह आतापर्यंत तीन चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नर ‘वायू’, ‘फिंडा’ आणि ‘अग्नि’ या चित्त्यांची मादी ‘दक्षा’बरोबर झुंज झाली. या झुंजीत ‘दक्षा’ गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर ‘दक्षा’चा मृत्यू झाला आहे. यापूर्वी २३ एप्रिलला सहा वर्षाच्या ‘उदय’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता.
मध्य प्रदेशात बस पुलावरून कोसळली, भीषण अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये बस पुलावरून कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १५ प्रवाशांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ही बस सेगाववरून इंदौरच्या दिशेने जात होती. यावेळी बसमधून ४० प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान, खरगोनमधील दसंगा गावाजवळील पुलावर ही बस पोहोचताच चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. मात्र, कठडा तुटल्याने ही बस खाली कोसळली.
प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कारांची घोषणा
यंदाच्या पुलित्झर पत्रकारिता पुरस्कारात ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) या वृत्तसंस्थेने आपला ठसा उमटवला आहे. एपीला मानाच्या ‘सार्वजनिक सेवा पुरस्कारा’सह दोन पुलित्झर पुरस्कार मिळाले. युक्रेन युद्धाच्या वृत्तांकनासाठी एपीला सार्वजनिक सेवेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.याशिवाय द न्यूयॉर्क टाईम्सला रशियाच्या घुसखोरीवरील वृत्तांकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.वॉशिंग्टन पोस्टचे वार्ताहर कॅरोलिन किचनर यांना त्यांनी मागील वर्षी अमेरिकेत सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताबाबत दिलेल्या निकालावर केलेल्या वार्ताकनासाठी राष्ट्रीय वार्ताकनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. सध्या न्यूयॉर्क टाईम्समध्ये काम करत असलेल्या ईली सस्लोव यांना त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये केलेल्या कामासाठी फिचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार मिळाला.
कर्नाटकमध्ये उद्या मतदान, प्रचार समाप्त ; चुरशीची तिरंगी लढत
विलक्षण चुरशीने लढल्या जात असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संपला. राज्यातील २२४ जागांसाठी बुधवार दि. १० रोजी मतदान होत आहे. सत्तारूढ भाजपविरोधात काँग्रेस अशी येथे झुंज आहे. काही ठिकाणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचीही ताकद आहे. गेले पंधरा दिवस देशभरातील प्रमुख नेते कर्नाटकमध्ये तळ ठोकून होते. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप मोठय़ा प्रमाणात करण्यात आले. भाजपची सारी भिस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आहे. दक्षिणेतील हे महत्त्वाचे राज्य पुन्हा जिंकून भाजप ३८ वर्षांचा इतिहास मोडणार का? ही उत्सुकता आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला कर्नाटक जिंकणे महत्त्वाचे आहे. येथे सत्ता आल्यास काँग्रेसचे महत्त्व वाढणार आहे. माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सत्तेसाठी सारी ताकद लावली आहे.
SD Social Media
9850 60 3590