प्रियकराच्या साथीने महिलेने आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. हत्येनंतर महिलेने किचनमध्ये खड्डा खोदून पतीचा मृतदेह पुरला. मात्र महिलेच्या सहा वर्षांच्या मुलीमुळेच या प्रकाराचा पर्दाफाश झाला. आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तिचा बॉयफ्रेण्ड पसार झाला आहे.
मुंबईतील दहीसर पूर्व खान कंपाऊंड परिसरात महिलेने आपल्या पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहीम शेख गेल्या काही दिवसापासून गायब असल्याची तक्रार त्याच्या मित्राने पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली, तरीही रहीम कुठेच सापडत नव्हता.
अखेर रहीमचा भाऊ रईस शेख मुंबईत आला. त्यानेही भावाची विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रहीमच्या पत्नीने आपल्या प्रियकराला सोबत घेऊन पतीची हत्या केल्याचं समोर आलं. रहीमच्या सहा वर्षांच्या मुलीने झालेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर या मृत्यूचे गूढ उलगडले.
रहीमच्या पत्नीने आपल्या बॉयफ्रेण्डच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर राहत्या घरातील किचनमध्येच खड्डा खोदून तिने पतीचा मृतदेह पुरला. खड्डा बुजवून त्यावर टाईल्सही लावल्या. त्यानंतर जणू काही झालंच नाही, अशा आविर्भावात ती राहत होती. मात्र पोलिसांच्या तपासात त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीने आईने बाबांना किचनमध्ये पुरल्याचं सांगितलं आणि तिच्या कुकर्मांचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी रहीम शेख यांच्या पत्नीला अटक केली असून तिचा साथीदार सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. दहीसर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.