जन्म.२ जून १९६३
मराठी चित्रपट-हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिकांवर आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीश भारद्वाज. नितिश भारद्वाज माजी खासदार आहेत. मध्यप्रदेश पर्यटन विभागाचे ते अध्यक्ष देखील राहिले होते. ‘गीतारहस्य’, ‘अपराधी’ इत्यादी मालिकांबरोबरच गोळवलकर गुरूजींच्या जीवनावरील गाजलेल्या ‘कर्मयोगी’ या डॉक्युमेन्ट्रीचे चे ते निर्माते दिग्दर्शकदेखील आहेत. नितिश उत्तम छायाचित्रकार आहेत, पर्यटक आहेत, साहित्यीक आहेत, वक्ते आहेत.कोकणातून मुंबईत स्थायिक झालेल्या ‘चित्रपुर सारस्वत’ समाजातील ‘उपाध्ये’ घराण्यामध्ये नितिशजींचा जन्म झाला. नावाप्रमाणेच सरस्वतीचे पुत्र असलेल्या या लोकांमध्ये कलाक्षेत्राबद्दलची जाण आणि ओढ ही पिढिजात देणगीच असते. मध्यमवर्गीय मराठी घरात नितिशजींना अभिनयासाठी अभ्यासातून सुट नव्हती. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमधून त्यांनी पशुचिकित्साशास्त्र आणि पशुपालनात शिक्षण पुरं केलं. गुरांचा डॉक़्टर म्हणुन करिअर सुरू करतांना एक दिवस ‘वृंदावनी गोधने चारणाऱ्या’ श्रीकृष्णाची भुमिका आपल्याला करायची आहे हे नितिश भारद्वाजच्या ध्यानिमनीही नसेल. अभिनयाची ओढ होतीच. राजबिंडं रूप, व्यक्तीमत्त्व, आणि भारदस्त आवाजही जवळ होता. मग प्रयत्न सुरू झाले. मुंबई दुरदर्शनमध्ये निवेदक म्हणुन डॉक्टर नितिश उपाध्ये (भारद्वाज) रूजू झाला. निवेदन करणारा तरूण चेहरा हळुहळु सुपरिचीत होत गेला. दरम्यान बी आर चोप्रा ‘महाभारत’ बनवणार होते. श्रीकृष्णाच्या प्रमुख भुमिकेसाठी स्क्रीन टेस्ट्स सुरू होत्या. नितिशचं थोडंसं मिष्कील, थोडंसं गुढ, बरंचसं सांगुन जाणारं, आणि खुप काही राखुन ठेवणारं सुचक स्मितहास्य दिग्दर्शक रवी चोप्राच्या मनाला भावलं. बस! निर्णय झाला! नितिश उपाध्येने छोट्या पडद्यावर नितिश भारद्वाज म्हणुन आगमन केलं, आणि मग इतीहास बनला! १९८८ ते ९० या दोन वर्षात महाभारत घराघरात पोचलं, आणि श्रीकृष्ण मनामनात पोचले. नितिश भारद्वाजनंतर अनेकांनी श्रीकृष्ण केले. अगदी स्वप्नील जोशीसारख्या गोंडस तरूणापासून ते डॉक्टर सर्वदमन बॅनर्जींसारख्या विद्वानापर्यंत सगळ्यांनीच या भुमिकेत रंग भरून पाहिले. पण आजही श्रीकृष्ण म्हटलं की नितिश भारद्वाज हा एकच चेहरा डोळ्यापुढे येतो.
महाभारतातील कृष्णाच्या भुमिकेने नितिश भारद्वाजयांचे जीवन बदलवून टाकलं. एके काळी केवळ अभिनेता होण्याचं स्वप्न बाळगणारा हा तरूण आता भगवद्गीतेच्या अभ्यासाकडे आकर्षित झाला. एका वेगळ्या दृष्टीकोणातून गीतेचा अभ्यास करणे सुरू झाले. श्रीकृष्ण हा दैवी दृष्टीकोनातून न पाहता तात्त्वीक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला. एक वैचारिक क्रांती घडवणारा क्रांतीकारी, जगावेगळी वाट धरायला न बिचकणारा एक विचारवंत, वीर पुरूष, आणि जगद्गुरू या दृष्टीने कृष्ण अभ्यासणे सुरू झाले. ‘गीतारहस्य’ या मालिकेची बैठक तयार होऊ लागली.
या दरम्यान श्रीकृष्णाच्या इपिक इमेज मधून बाहेर येऊन अभिनय करण्याची धडपड सुरूच होती. १९९१ मध्ये पी पद्मराजन यांचा ‘न्यान गंधर्वन’ हा मल्याळी चित्रपट त्यांना मिळाला. यात एका लाकडाच्या पुतळ्यातून प्रकट होणाऱ्या आणि केवळ नायिकेलाच दिसु शकणाऱ्या नायकाची भुमीका केली. हा चित्रपट आजही मल्याळम चित्रसृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. हिंदी आणि मराठी चित्रपटांत मात्र नितिशजींना हवं तसं यश मिळालं नाही. त्यांची ‘श्रीकृष्ण’ ही पॉप्युलर इमेज या वेळी त्यांचं नुकसान करून गेली. मात्र या इमेजचा अगदी चपखल वापर त्यांनी एका नव्या क्षेत्रात पाउल ठेवल्यावर त्यांना झाला. ते म्हणजे राजकारण !
श्रीकृष्णाच्या भुमिकेच्या निमित्ताने अनेक विद्वज्जनांशी आणि राजकिय नेतृत्त्वांशी त्यांचा संपर्क आला. यातूनच अभ्यासु वृत्तीबरोबरच राजकारणातही काहीतरी करून दाखवण्याची ईच्छा जागृत झाली. भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बिहारमधील जमशेटपुरमधून निवडणुक लढवली. ईंदरसिंग नामधारी आणि शैलेन्द्र महतो यांसारख्या खंद्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत त्यांनी मोठा विजय प्राप्त केला.
अकराव्या लोकसभेच्या अठरा महिन्याच्या कारकिर्दीत नितिश भारद्वाज यांनी आपण केवळ लेखकाने लिहलेले स्क्रीप्ट वाचणारे कलाकार नसल्याचे सिद्ध केले. टेलीव्हीजन चॅनलवरील वाढती अश्लीलता, असंसदिय भाषा, याचा नवीन पिढीवर होणारा परिणाम, इत्यादी गंभीर विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडले. दुर्दैवाने ही लोकसभा अल्पजीवी ठरली, आणि नितिशजींची खासदार म्हणुन कारकिर्दही थोडक्यातच संपली. याच दरम्यान रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालीकेला दिलेली ७५ भागांची मुदत संपत आली होती, आणि दूरदर्शनने त्यांना मालिका गुंडाळायचे आदेश दिले होते. ‘खासदार’ नितिश भारद्वाज यांची ‘गीतारहस्य’ ही मालीका त्या स्लॉटमध्ये लागावी म्हणुन शासनाचा हा डाव आहे, असा सुर टिव्ही क्षेत्रामध्ये निघाला आणि नितिश भारद्वाज वेगळ्याच वादात फसले. राजकारणात मिळालेलं पद हे कलाक्षेत्रात आड येतंय हे लक्षात आल्यावर त्यांनी १९९८ ची निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. १९९९ मध्ये ‘गीतारहस्य’ मालीका सुरू झाली, आणि त्यानंतर लगेच मध्यावधी निवडणुका आल्या. या वेळी उमा भारती यांच्या प्रोत्साहनामुळे नितिशजींनी मध्यप्रदेशातील राजगड येथुन दिग्वीजयसिंग यांचे बंधु लक्ष्मणसिंग यांच्या विरोधात निवडणुक लढवली. मालिका टिव्हीवर सुरू असल्यामुळे उमेदवाराचा आयता प्रचार होतो आहे, असा आरोप विरोधकांनी लावल्यामुळे निवडणुक आयोगाने ‘गीतारहस्य’ चे प्रसारण थांबवले. या निवडणुकीत नितिशजीं पराभुत झाले, आणि त्यानंतर ही अप्रतीम मालिकाही आपल्याला बघायला मिळाली नाही. दरम्यान, उमा भारती यांच्या भाजपा मधून गच्छंती नंतर नितिशजींचा पक्षातील प्रभावही कमी झाला. राजकिय स्थित्यंतरे झाली, तशी वैयक्तीक आयुष्यातही वादळे आली. पहिली पत्नी मोनिशापासून घटस्फोट झाला. त्यांची दोन्ही मुलं २००३ पासून आईबरोबर लंडनला असतात. पुढे आय.ए.एस. अधिकारी असलेल्या स्मिता गाटे या पुण्याच्या मराठी तरुणीशी नितिशजींचा विवाह झाला. त्यांचे ‘पसंत आहे मुलगी’, ‘अनपेक्षित’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘तुझी माझी जमली जोडी’ हे मराठी चित्रपट व ‘नाचे नागीन गली गली’, ‘संगीत’, ‘मोहेंजोदारो’ हे त्यांचे हिंदी चित्रपट. ते आज ही चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शन करत असतात. मराठी चित्रपट ‘पितृऋण’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. ‘ई टीव्ही मराठी’ वाहिनीवरील ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’ या कार्यक्रमासाठी भारद्वाज यांनी रमेश देव आणि सुधा चंद्रन यांच्याबरोबर परीक्षक म्हणून काम केले होते. विविध ठिकाणी साहित्य संमेलनांपासुन ते सामाजीक कार्यक्रमांपर्यंत त्यांना वक्ता म्हणुन आमंत्रीत केले जाते.सध्या ते भारतीय जनता पक्षाचे काम करत आहेत.