जन्म. २ जून १९८८ मुंबईत.
गेल्या काही वर्षांत तेजश्री प्रधाननं छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, प्रसन्न भाव चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला. गेल्या वर्षी ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतल्या तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. तेजश्री तिच्या अभिनयासाठी मोठ्या पडद्यावरही नावलौकिक मिळवत आहे.तेजश्री प्रधान डोंबिवली येथे लहानाची मोठी झाली. डोंबिवली येथील चंद्रकांत पाटेकर शाळेतून तेजश्रीने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर केळकर कॉलेजमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. तेजश्री शाळेत असताना अभ्यासात सर्वसाधारण होती. आठवी ते दहावी ती वर्गात मॉनिटरदेखील होती. मराठी हा तिचा आवडता विषय होता. भूगोल आणि इतिहास कधीच जमले नसल्याचे ती सांगते. शाळेत असताना तेजश्री गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये कायम सहभागी होत असते. मराठी माध्यमातून तिचे शिक्षण झाले आहे. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करून आपला कल अभिनयाकडे वळवला. ‘लक्ष्मी’ हा तिने साइन केलेला पहिला चित्रपट होता. अमरावती येथे या चित्रपटाचे पहिले शेड्युलदेखील तिने पूर्ण केले होते. पण काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. त्यानंतर तेजश्रीला ‘झेंडा’ हा चित्रपट ऑफर झाला आणि यातून तेजश्रीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. ‘झेंडा’, ‘लग्न पाहावे करून’, ‘शर्यत’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘ती सध्या काय करते’,‘ओली की सुकी’, ‘असेही एकदा व्हावे’ हे तिचे महत्त्वाचे चित्रपट.झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेने तेजश्री प्रधान लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.२०१३ ते २०१६ या साडेतीन वर्षांच्या कालावधीत श्री-जान्हवीच्या जोडीचं प्रेक्षकांवर गारुड होतं. तिचा ‘काहीही हं श्री’हा डायलॉग तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सहा सासवांची लाडकी सून प्रेक्षकांना आपल्या घरची वाटू लागली. अगदी झी मराठी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नायिका, सून, जोडी अशा सर्वच महत्त्वाच्या पुरस्कारांवर सलग तीन वर्ष तिने नाव कोरलं.‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने तिला ओळख दिली असली, तरी तेजश्री त्याआधीपासूनच मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. २००७ मध्ये त्यावेळच्या ईटीव्ही मराठी वाहिनीवर ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेने कमालीची लोकप्रियता मिळवली होती. तेजश्री या मालिकेचा भाग होती. आनंद अभ्यंकर, गिरीश ओक, वंदना गुप्ते, सई ताम्हणकर, प्रदीप वेलणकर अशा एकापेक्षा एक कलाकारांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली.
त्यानंतर ती तुझं नि माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी या घरची, या तेजश्रीच्या गाजलेल्या मालिका आहेत. विशेष म्हणजे तेजश्रीच्या या चारही मालिकांच्या शीर्षकांमध्ये घर हा शब्द समान आहे. तिचे ‘कार्टी काळजात घुसली’ हे नाटक रंगभूमीवर गाजले आहे. आता तर हिंदी रंगभूमीवरही ती रमताना दिसतेय. अभिनेता शर्मन जोशीसोबत ‘मैं और तू’ या हिंदी नाटकात तिने काम केले आहे. ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत सासूच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी तेजश्री प्रधानने खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. तेजश्री प्रधान बॉलिवड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे अभिनेता शर्मन जोशी सोबत ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘बबलू बॅचलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात तेजश्रीने लिपलॉक सीन दिला आहे. २०१४ मध्ये अभिनेता शशांक केतकरसोबत तेजश्रीचे लग्न झाले होते. पण दुर्दैवाने वर्षभरच हे लग्न टिकले आणि हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत.
नुकतेच तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील सर्वाधिक आकर्षक टीव्ही अभिनेत्री ठरली आहे. टीव्ही विश्वातील सर्वाधिक आकर्षक महिलांच्या यादीत ती प्रथम क्रमांकावर आहे.