केरळमध्ये मान्सुन दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सुन दाखल होण्याची अनेक जण वाट पहायतायत. सध्या अरबी समुद्रात मान्सुन सक्रीय होण्यासाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे सध्या कोकणात मान्सूनच्या आगमनाचे संकेत मिळतायत. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर काळ्या ढगांची गर्दी पहायला मिळतेय. तर मतलई वारे सुद्दा सध्या वेगाने वाहतायत. रत्नागिरीच्या किनारपट्टीवर जमलेले काळे ढग हे मान्सूनच्या आगमनाची वर्दी देत आहेत.
सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसत आहे. मुंबई आणि उपनगराच्या परिसरात बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काल मुंबईत पावसाच्या तुरळक सरी बरसल्या होत्या. आजदेखील सकाळपासून हलकासा पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस मुंबईसह राज्यभरात कधी येणार, याची प्रतिक्षा आता सर्वांना लागली आहे.
कराड शहर व आसपासच्या परिसरात मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरुन राहिले होते. मलकापुर कराड परिसरात घरामध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. रस्ते व गटारामधुन मोठे पाणी वाहत होते ग्रामीण भागात शेतातील बांध फुटून पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश्य जोरदार पावसाचा सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनाही बसला आहे कराड गोटे येथील निवासस्थानी जोरदार पाऊसाचे पाणी भरल्याने त्यांच्या कार्यालयासह निवासस्थान जलमय झाले होते.
वसई विरारमध्ये मंगळवारी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दुपारपासून वसई विरारमध्ये ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी सात नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक बरसलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. वसई तालुक्यात पावसाच्या रिमझिम आणि जोरदार सरी बरसल्या आहेत.