आज दि.८ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आता बंद होऊ शकते ही सुविधा

भारतीय रेल्वे आपल्या दैनंदिन कामात तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतेय. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ट्रेन अधिक सुरक्षित आणि वेगवान केल्या जाताय. यासोबतच टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. दरम्यान, रेल्वे आता आपले तिकीट छापखाने बंद करणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वे तिकीट प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होईल का? नजीकच्या भविष्यात ते होण्याची शक्यता कमी आहे. वास्तविक, रेल्वे तिकीट छपाई खाजगी क्षेत्राकडे सोपवण्याची शक्यता आहे.

‘अजित पवारांच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या..’ सुधीर मुनगंटीवार यांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या. मात्र, आता अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. साताऱ्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला असून बदल्यांचे रेट ठरल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. अजित पवाराच्या कार्यकाळात हजारो दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडल्या असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला. ते गोंदियात बोलत होते.

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना ठाणे पोलिसांची नोटीस, तक्रारीनंतर एक्शन

ठाण्यात रामकथा वाचन करण्यासाठी आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. रामकथा सुरू होण्याआधी त्यांना ही नोटीस देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी ही नोटीस पाठवली होती.

रविवारी ठाण्यातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे तीन दिवसांचा रामकथा आणि हनुमान कथा कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी हनुमान कथा सुरू केली. पण कथा सुरू होण्याआधी वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लेखी पत्र देत म्हटलं की, बागेश्वर धामच्या बाबांनी कोणतंही असं वक्तव्य करू नये ज्यामुळे कायदा व्यवस्थेत अडचण निर्माण होईल.

माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाला, सर्जा-राजा बैलजोडी सज्ज

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ११ जून ला पंढरपूकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी माऊलींचा रथ ओढण्याचा मान आळंदीमधील भोसले कुटुंबाच्या सर्जा- राजा बैलजोडीला मिळाला आहे. २००१, २०११ नंतर आता यावर्षी पुन्हा भोसले यांच्या बैलजोडीला हा मान तिसऱ्यांदा मिळाला आहे. रथ ओढण्यासाठी भोसले कुटुंबाने कर्नाटकमधून खिलार जातीची बैलजोडी विकत घेतली आहे अशी माहिती संतोष तुळशीराम भोसले यांनी दिली.

पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’चित्रपटावर बंदी घातल्यानंतर निर्मात्यांनी दिला इशारा

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी ( ८ मे ) ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर राज्यात बंदी घातली आहे. बंगालमधील सर्व थिएटर्समधील स्क्रीनवरून हा चित्रपट काढून टाकण्याचे आदेश मुख्य सचिवांना ममता बॅनर्जींनी दिले आहेत. या निर्णयानंतर ‘द केरला स्टोरी’च्या निर्मात्यांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.“द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचललं आहे,” असं ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं आहे.

“इस्लाम तर स्वीकारावाच लागेल…”; प्रसिद्ध मॉडेलवर धर्मांतरासाठी दबाव

सध्या देशभरात ‘दी केरला स्टोरी’ चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा विषय आणि त्यात करण्यात आलेले दावे यावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ३२ हजार महिलांचं धर्मांतर करण्यात आल्याचा दावा चित्रपटात करण्यात आला आहे. यावर आक्षेप घेतला जात असताना राजधानी दिल्लीतही अशाच प्रकारे एका महिला मॉडेलवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एएनआयने यासंदर्भात सविस्तर वृत्त दिले आहे. यासंदर्भात पोलिसांनी महिलेची तक्रार दाखल करून घेतली आहे.

राजस्थानात लष्कराचं मिग 21 विमान घरावर कोसळलं, दोन महिलांचा मृत्यू तर एक जण जखमी

भारतीय वायुदलाचं मिग 21 हे विमान राजस्थानमध्ये एका घरावर कोसळलं. हे विमान कोसळून जो अपघात झाला त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक माणूस जखमी झाला आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. भारतीय वायुदलाचं हे विमान हनुमानगड गावातल्या बहलोल नगरमध्ये कोसळलं. हे विमान ज्या घरावर कोसळलं त्यातल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. वैमानिक आणि सहवैमानिकाने वेळीच उडी मारल्याने त्या दोघांचे प्राण वाचले आहेत.

कुस्तीपटूंच्या आंदोलनात शेतकरी आक्रमक, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले

दिल्लीत जंतर-मंतरवर कुस्तीपट्टूंचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी जंतर-मंतर इथं पोहोचले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्स तोडले. दुसऱ्या बाजूला कुस्तीपट्टूंनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.

महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. कुस्तीपट्टूंच्या समर्थनासाठी रविवारी शेतकरी दिल्लीतील जंतर मंतरवर पोहोचले होते. यात अनेक शेतकरी नेत्यांचाही समावेश होता. यावेळी संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला इशारा दिला होता. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं होतं की, आरोपी बृजभूषण शरण सिंहला 21 मे पर्यंत अटक व्हायला हवी.

पंचांच्या निर्णयावर नाराज, पैलवान बाला रफिकने अर्ध्यातच सोडलं मैदान

महाराष्ट्र केसरी बाला रफिख शेखने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली. चालू असलेली कुस्तीची लढत सोडून त्याने मैदान सोडलं. चिपळूणमध्ये कोकण केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. यातील एका लढतीत बाला रफिक शेखने कुस्तीचे मैदानत सोडले. पंचांचा निर्णय न पटल्यानं बाला रफिक शेखने हे पाऊल उचललं.चिपळूणच्या खेर्डी इथं कोकण केसरी स्पर्धा सुरू आहे. यातील एका लढतीवेळी हा प्रकार घडला. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि उपकेसरी प्रकाश बनकर यांची लढत होती. यात पंचांनी दिलेला एक निर्णय बाला रफिक शेखला पटला नाही. त्यामुळे त्याने थेट लढतीतून माघार घेत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर बाला रफिक पुन्हा मैदानात आला पण कुस्तीचा निकाल लागला नाही. अखेर सामना बरोबरीत सुटला.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.