आज दि.१२ आॕगस्ट च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

राज्यसभेमध्ये झालेल्या राड्यानंतर
देशभर संमिश्र प्रतिक्रिया

राज्यसभेमध्ये बुधवारी झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर देशभर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. विरोधी पक्षांनी यासाठी सत्ताधारी मोदी सरकारला जबाबदार धरलं असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र हा काँग्रेससहीत विरोधकांचा पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेमध्ये पेगॅसस, कृषी कायदे या मुद्द्यांवरून काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी तुफान गदारोळ घातला. मार्शल्सकरवी हा सर्व गोंधळ आवरावा लागला. मार्शल्सनी चुकीच्या पद्धतीने सदस्यांना वागणूक दिल्याचा दावा विरोधकांनी केला. एक महिला खासदाराची महिला मार्शलसोबत धक्काबुक्की झाल्याचं राज्यसभेतील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. या महिला म्हणजे काँग्रेस खासदार छाया वर्मा असल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यसभेतील गैरवर्तन
पहिल्यांदाच पाहिले : शरद पवार

राज्यसभेत झालेल्या गोंधळानंतर याप्रकरणाला आता गंभीर स्वरुप आले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. 40 ते 50 मार्शल यांना बोलावून खासदारांसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. गेल्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे काही पाहिलेले नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला आहे. मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात हे प्रथमच पाहत आहे. आमच्या पुरुष खासदारांना रोखण्यासाठी महिला मार्शलचा वापर केला जात आहे. तर महिलांना रोखण्यासाठी पुरुष मार्शलचा वापर करुन गैरवर्तन करण्यात आले आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत पहिल्यांदाच
खासदारांना मारहाण : राहुल गांधी

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात १५ विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या दरम्यान राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले आणि सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल भाष्य केलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली, बाहेरून लोकांना बोलावले गेले आणि खासदारांना मारहाण करण्यात आली.

सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन
फली नरिमन निवृत्त

भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन आज गुरुवारी निवृत्त झाले. न्यायमूर्ती नरिमन यांचा वकिलीचा कार्यकाळ प्रचंड मोठा राहिलाय. रोहिंटन नरिमन हे प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांचे पुत्र आहेत. त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिसेंबर १९९३ मध्ये वयाच्या ३७व्या वर्षी त्यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होते. तोपर्यंत नियमांनुसार साधारणपणे केवळ ४५ वर्षांवरील व्यक्तीलाच ते पद दिलं जायचं.

भारताने अफगाणिस्तानला दिलेले
हेलिकॉप्टर तालिबानच्या ताब्यात

अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी तालिबानकडून हल्ले सुरू आहेत. यादरम्यान, भारताने अफगाणिस्तानला भेट दिलेल्या हेलिकॉप्टरवर ताबा मिळवल्याचा दावा तालिबानने केला आहे. अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड गायब आहेत.

शिराळाच्या नाग पंचमीवर
ड्रोन कॅमेराची नजर

बत्तीस शिराळा व परिसरात शुक्रवारी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीवेळी यंदा करोनामुळे गर्दी आणि पर्यावरणाच्या काळजीतून जिवंत नागपूजा रोखण्यासाठी ‘ड्रोन कॅमेऱ्या’द्बारे वन विभाग नजर ठेवणार आहे. यासाठी सोळा पथके तैनात करण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी दिली.

भारत पाश्चिमात्यांच्या वैचारिक
गुलामगिरीमधून कधी मुक्त होणार

योगगुरु रामदेव बाबांनी स्वातंत्र्यासंदर्भात बोलताना आपण इंग्रजापासून राजकीय स्वातंत्र्य मिळवलं असलं, त्यांच्या गुलामगिरीमधून मुक्त झालो असलो तरी आजही आपण अनेक गोष्टींबाबत त्यांचं अनुकरण करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. रामदेव बाबांनी भारत पाश्चिमात्यांच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक गुलामगिरीमधून कधी मुक्त होणार असा प्रश्न उपस्थित केलाय. रामदेव यांनी भारताला अजूनही अनेक गोष्टींबद्दल आत्मनिर्भर होण्याची गरज आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात
रोहित शर्मा, राहुलची सावध खेळी

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानात सुरुवात झाली आहे. भारताच्या आघाडीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुलने सावध खेळी करत आहेत. या कसोटीवरही पावसाचं सावट आहे. नाणेफेक इंग्लंडनं जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं दुसऱ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकुरऐवजी इशांत शर्माला संधी दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील विजय भारताच्या हातून पावसाने हिरावून नेला होता. मालिकेत अद्याप कोणत्याही संघाला आघाडी नाही. दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.

नागपूर महापालिकेतील भाजपचे
सर्वाधिक 52 मौनी नगरसेवक

नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. ज्या उद्देशानं नागरिक नगरसेवकांना निवडून देतात त्या उद्देशालाच या नगरसेवकांनी हरताळ फसलाय.

राज्यात डेल्टा प्लसचे
आणखी 20 रूग्णांची नोंद

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात डेल्टा प्लसची एकूण रूग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे. यात मुंबईत 7, पुण्यात 3, नांदेड, गोंदिया, रायगड आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 तर चंद्रपूर, अकोल्यात एक-एक रूग्ण वाढला आहे.

राज्यात पुढील चार ते पाच दिवस
मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल

राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयानं महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवसांसाठीचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानं सध्या उकाडा वाढलाय, नागरिक त्रस्त आहेत. तर पावसाचं प्रमाण कमी असलेल्या भागात पीक जगवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.

जळगाव जिल्हा बँकेची
इडीने मागवली माहिती

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे-खेवलकर या अध्यक्ष असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून पत्र पाठवण्यात आले आहे. ईडीकडून जळगाव जिल्हा सहकारी बँकेकडून माहिती मागवण्यात आली आहे. मुक्ताईनगर येथील साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाबाबत ईडीने जिल्हा सहकारी बँकेला माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

नांदेडमध्ये भाजप युवा मोर्चाच्या माजी शहराध्यक्षावर गोळीबार, घटना सीसीटीव्हीत कैद

नांदेडमध्ये भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्षावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत पळ काढल्याने त्याचा जीव बचावला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नांदेड भाजपा युवा मोर्चाचा माजी शहराध्यक्ष सोनू कल्याणकर वर हा गोळीबार करण्यात आला आहे.

सोनू कल्याणकर श्रीनगर भागातील आपल्या घराच्या गेटजवळ बसला होता. रात्री 9 च्या सुमारास दुचाकीवर तिघेजण त्याच्या घरासमोर आले. त्यापैकी दोघांनी सोनूवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. प्रसंगावधान राखत सोनू घरामध्ये पळाला त्यामुळे त्याचा जीव वाचला.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.