कोरोनाकाळात रेल्वे तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे. हे दर कमी होतील, अशी आशा सामान्य नागरिकांना आहे. मात्र, इंधनाच्या दरांप्रमाणे याठिकाणीही सामान्य लोकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता अधिक आहे. कारण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेला दिलेल्या लिखीत स्पष्टीकरणातून तसे संकेत मिळत आहेत.
अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे राज्यसभेला दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला रेल्वेच्या तिकीटांवर कोणतीही सूट देण्याचा मंत्रालयाचा विचार नाही. तसा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून रेल्वेकडून तिकीटांवर देण्यात येणारी सूट पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले.
कोरोनापूर्व काळात भारतीय रेल्वेकडून दिव्यांग व्यक्ती, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना तिकीटांवर सवलत दिली जात होती. मात्र, आता कोरोनामुळे ट्रेनमध्ये मर्यादित प्रवाशांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे रेल्वेकडून तिकीटांवरील सर्वप्रकारच्या सवलती बंद करण्यात आल्या आहेत.
रेल्वेकडून तिकीटांवर कोणाला सूट दिली जाते?
भारतीय रेल्वेकडून तिकीटांवर एकूण 51 प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सर्व सवलती 20 मार्च 2020 पासून बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी, विधवा, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, कलाकार, खेळाडू, आरोग्य कर्मचारी अशांचा समावेश आहे. रेल्वे तिकीटांवर आजपर्यंत ज्येष्ठांना सर्वाधिक म्हणजे अगदी 50 टक्क्यापर्यंतही सूट दिली जात होती.
IRCTC कडून रिझर्व्हेशनच्या नियमांत बदल
आयआरसीटीसीकडून रेल्वे बुकिंगच्या ऑनलाईन नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करु शकणार नाही.
कोरोना संकटामुळे अनेक प्रवाशांनी दीर्घकाळापासून रेल्वेने प्रवास केला नव्हता. या लोकांसाठी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. अशा प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरून तिकीट बुक करण्यासाठी मोबाईन नंबर व्हेरिफाईड करावा लागेल. इतर प्रवाशांना मोबाईल व्हेरिफिकेशन बंधनकारक नसेल.
मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सर्वप्रथम IRCTC च्या संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल. त्याठिकाणी व्हेरिफिकेशन विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये ईमेल आणि मोबाईल क्रमांक टाकावा. याठिकाणी असलेल्या एडिट ऑप्शनचा वापर करुन तुम्ही ईमेल आणि मोबाईल क्रमांकाचा तपशील बदलू शकता. तुम्ही व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक व्हेरिफाईड होईल. (फोटो क्रेडिट गुगल)