जगभरातील क्रिकेट चाहते सध्या IPL 2022 मेगा लिलावाची वाट पाहत आहेत. आयपीएल 2022 धमाकेदार असणार आहे कारण या हंगामात 8 नाही तर 10 संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. मात्र आयपीएलचे आयोजन होण्यापूर्वीच पाकिस्तानने त्यात अडथळा आणला आहे. वास्तविक पाकिस्तानमुळे काही खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडू शकतात.
ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी मेगा लिलावापूर्वी अनिश्चित आणि कठीण स्थितीत आहे. शुक्रवारी झालेल्या सीए संचालकांच्या बैठकीनंतर पाकिस्तानच्या तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एका टी-20 आंतरराष्ट्रीय दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक मंजूर करण्यात आले. महिनाभर चालणाऱ्या या दौऱ्यामुळे काही प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडूंना IPL 2022 मधील संभाव्य चार ते पाच सामने मुकावे लागू शकतात, ज्यामुळे संघ मालकांपुढे प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या महिन्यात, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली होती की इंडियन प्रीमियर लीगचा 15 वा हंगाम मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होईल. क्रिकबझच्या वृत्तानुसार, आगामी आयपीएल खेळाडूंना पाच दिवसांच्या क्वारंटाईनमधून जावे लागेल, याचा अर्थ त्यांना किमान 11 एप्रिलपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल. फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “काही ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप उशीरा सहभागी होऊ शकतील. दौऱ्यासाठी कोणाची निवड होते हे पाहावे लागेल. सीएने अद्याप पाकिस्तान दौऱ्यासाठी संघ जाहीर केलेला नाही. संघात स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंची नावे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श, जोश हेझलवूड यांसारख्या अव्वल खेळाडूंसह एकूण 47 ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या मेगा लिलावासाठी नोंदणी केली आहे. दुसरीकडे, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉइनिस यांना फ्रँचायझीने कायम ठेवले आहे.