निर्माता मधु मंटेना यांचा ‘रामायण’ हा चित्रपट या दिवसांमध्ये खूप चर्चेत आला आहे. माध्यम अहवालानुसार या चित्रपटात दीपिका पदुकोण, हृतिक रोशन, आणि दक्षिणचा स्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जर, या अहवालांवर विश्वास ठेवला तर, हृतिक रोशनच्या या चित्रपटात रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप मुख्य कलाकारांविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा चित्रपट खास बनवण्यासाठी मेकर्स परिश्रम घेत आहेत.
रावणाचे पात्र अधिक उठावदार होण्यासाठी त्याच्या लूकची खास पद्धतीने रचना करण्याची तयारी सुरू आहे. या अहवालांनुसार, यूएस बेस्ड कॉस्च्युम टीम हृतिकच्या या लूकसाठी विशेष मेहनत घेणार आहे. ही तीच टीम आहे, ज्यांनी ‘अवतार’ चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केले होते. मेकर्स आणि टीममधील हा करार फायनल झाला, तर ही टीम हृतिक रोशनसाठी खास रावणच्या लूकची रचना करेल.
मधु मंटेना यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचे बजेट सुमारे 500 कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 3 डी तंत्रज्ञान वापरून करण्यात येणार आहे. मधु मंटेना, नील मल्होत्रा आणि अल्लू अरविंद या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेत देखील प्रदर्शित होणार आहे.
या आधी या चित्रपटातील ‘रामा’च्या भूमिकेसाठी निर्माते मधु मंटेना यांनी प्रभासकडेही संपर्क साधला होता. परंतु, ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात तो आधीपासूनच ‘रामा’ची भूमिका साकारत आहे. ‘आदिपुरुष’ची घोषणा झाल्यानंतर, लगेचच मधु मंटेनाने ‘रामायण 3 डी’ची घोषणा केली. चित्रपटासाठी त्याला निर्माते देखील मिळाले आहेत. ‘रामायण’ चित्रपटाची टीम एका अशा सुपरस्टारचा शोध घेत आहे, जो ‘रामा’ची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकेल आणि त्यांच्या मते, महेश बाबू या भूमिकेत चपखल बसेल.
स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, मधु मंटेनाने, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि विकास बहल यांच्याकडून फँटम फिल्म्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. आता फँटम फिल्म तो एकट्याने चालवणार आहे. फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तो आपला ड्रीम प्रोजेक्ट बनवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असेही म्हटले जात आहे की, मधु मंटेना त्यांचा ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित करणार आहे. कारण, इतक्या मोठ्या महाकाव्याची कथा एका चित्रपटाच्या माध्यमातून दाखवणे कठीण आहे.