मंदिरे बंद असल्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. भाजपनेही कालच मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज यांनी आज मंदिराचा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेलाच राज यांनी साथ दिल्याचं बोललं जात असून त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
राज ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणातून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात. अस्वलाच्या अंगावर केस किती हे अस्वल मोजत नाही. आम्हीही मोजत नाही. सूडबुद्धीनेच सुरू आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं, असं सांगतानाच मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्ला राज यांनी केला.
गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे’ सरकारला असं झालं. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट आणली जात आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी केल्या आहेत. त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं ते म्हणाले.