राज्यात करोना संसर्ग पुन्हा झपाटय़ाने वाढत असून मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील दैनंदिन रूग्णवाढीबाबत सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. खबरदारी म्हणून पुन्हा मास्क सक्ती लागू करण्याबाबत करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केल़े त्यामुळे राज्यात लवकरच मास्क सक्तीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुन्हा करोनाचा संसर्ग वाढू लागला असून, गेल्या दीड महिन्यांत सातपटीने रुग्णवाढ झाली. विशेषत: मुंबई महानगर प्रदेशात दैनंदिन बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी राज्यातील करोनास्थितीचे सादरीकरण करताना परिस्थिती गंभीर होत असल्याचा इशारा दिला. गेल्या आठवडय़ात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यातील रुग्णवाढ १३५.६६ टक्के आहे. राज्याचे साप्ताहिक बाधित प्रमाण ४.७१ झाले असून मुंबईचे साप्ताहिक बाधित प्रमाण ८.८२ तर पालघर ४.९२ आणि पुणे ४.३९ असे आहे. शहरी भागातील विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील दैनंदिन रुग्णवाढ अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवडय़ात करोना परिस्थिचा आढावा घेऊन मास्क वापरण्याचे आवाहन जनतेला केले होते. मात्र लोकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही़ करोना उद्रेकाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आतापासूनच खबरदारीच्या उपायोजना करण्याची भूमिका काही मंत्र्यांनी मांडली. त्यावर परिस्थितीवर लक्ष असून तज्ज्ञांच्या कृती गटाशी पुन्हा चर्चा करून मास्क सक्तीबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले. त्यामुळे लवकरच राज्यात मास्क सक्तीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आठवडाभरात तिप्पट वाढ
मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यात रोज ४०० ते ५०० रुग्णांची नोंद होत होती. ५ जून रोजी राज्यात करोनाचे नवे १४९४ रुग्ण आढळले. आठवडाभरात दैनंदिन रुग्णवाढीत तिप्पट वाढ झाल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. तसेच यात एकटय़ा मुंबईचा वाटा ६७ टक्के असल्याचेही सांगण्यात आले. मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांतील साप्ताहिक नवी रुग्णसंख्या २९९२ वरून ७०५१ वर गेली आहे.