राज्यात एप्रिलच्या सुरूवातीपासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यादरम्यान बंगालच्या उपसागरात वादळाची स्थिती असल्याने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात पुढच्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह अन्य भागात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान देशभरात यंदा 90 टक्क्यांच्या आसपास पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहेत.
दरम्यान मागच्या 24 तासांत चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा, वाशीम येथे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 35 ते 39 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमान कमी-अधिक होत आहे. पारा 14 ते 25 अंशांच्या दरम्यान होता.
छत्तीसगड पासून विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे. पश्चिम राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावर ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
राज्यात यंदा पावसाचा धुमाकूळ
मागच्या दोन वर्षांपासून अल निनो वादळ सक्रीय असल्याने याचा परिणाम पावसावर होत असतो. यंदाही प्रशांत महासागरात अल- निनो सक्रिय झाल्याचे हवामान खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु भारतात चिंता करण्यासारखी परिस्थिती नसेल असाही अंदाज देण्यात आला आहे. अल-निनो असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.