अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. तीन मुलांची हत्या करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या वेळी महिलेचा पती बाजारात गेला होता. घरी परतल्यावर चार मृतदेह पाहून त्याला मोठा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना राजस्थानमधल्या चित्तोडगढ जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कापसन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरएनटी कॉलेजच्या पोल्ट्री फार्मवर भुरालाल आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या 7 वर्षांपासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत होते. बुधवारी रात्री भुरालाल दूध आणण्यासाठी बाजारात गेले होते. परत आल्यावर घरातील दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 28 वर्षांची पत्नी रूपा, 7 वर्षांची मोठी मुलगी शिवानी, 6 वर्षांचा मुलगा रितेश आणि 3 वर्षांची लहान मुलगी किरण फासावर लटकले होते.
घटनेची माहिती मिळताच कापसन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोल्ट्री फार्ममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीत ती महिला एकेक करुन आपल्या तीनही मुलांना फासावर लटकवताना दिसत आहे. आधी तीने मोठ्या मुलीला फास लावला. त्यानतंर मुलगा आणि मुलीला फासावर लटकावलं. त्यानंतर महिलेने स्वतः गळफास लावून घेतला.
हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पण त्या महिलेने टोकाचं पाऊल का उचललं याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही.