अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चाललीय. तालिबान्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळचा तालिबान बदलल्याचा दावा केला. तसेच शरिया कायद्यानुसार महिलांना स्वातंत्र्य देऊ असं म्हटलं. मात्र, या तालिबानचा खरा शोषणकारी चेहरा वारंवार समोर येत आहे. अनेक व्हिडीओंमध्ये तालिबानचा सामान्य नागरिकांवरील अत्याचार उघड होतोय. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानमधील भारतीयांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र, अद्यापही 1600 भारतीय तालिबानचं नियंत्रण असलेल्या अफगाणमध्ये अडकलेले आहेत.
अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये भितीचं वातावरण तयार झालंय. सामान्य नागरिक अफगाणिस्तान सोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काबुल विमानतळावर प्रचंड गर्दी झालीय. लोक मिळेल त्या पद्धतीने इतर देशांमध्ये आसरा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर तालिबानकडून गोळीबार होत असल्याचीही माहिती समोर येतेय. त्यामुळे भारतासाठीही ही काळजीची बाब आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये अद्यापही 1600 पेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यांना तेथून सुरक्षित काढण्यासाठी दिल्लीत मिशन काबुलची स्क्रिप्ट तयार केली जातेय. मात्र हे खूप कठीण मिशन असणार आहे.
काबुल एअरपोर्टवरील दृश्ये पाहिली की अंगावर काटा येतो. विमानतळाच्या धावपट्टीवर शेकडो लोक आपला जीव वाचवण्यासाठी विमानांमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. यात काहींचा मृत्यूही झाला. यावरुनच तालिबान राजवटीची लोकांमधील भितीची कल्पना करता येतेय. म्हणूनच भारताला काबुलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची चिंता लागलीय. यासाठीच भारताकडून प्लॅन तयार केला जातोय.
दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. 17 ऑगस्टला सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन दिल्लात आले.
भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून मायदेशी परत आणले गेलेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांचा समावेश होता. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी बोलावण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी (16 ऑगस्ट) विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उड्डान केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.