कर्नाटकचे दोन तुकडे करा, त्यामुळे प्रश्न सुटेल असं म्हणणाऱ्या मंत्र्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. मराठी माणसांना होणाऱ्या त्रासाचा विचार करून मंत्र्याने कर्नाटकचे दोन भाग करण्याची मागणी केली होती. त्यांचं बेळगावशी खास नातं होतं. कर्नाटकचे मंत्री उमेश कट्टी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
मंत्री उमेश कट्टी हे कर्नाटक सरकारच्या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठा आणि वने मंत्री होते. त्यांनी आपल्या खात्यांची जबाबदारी अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडली होती. त्यांची प्रकृती मंगळवारी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रात्री १० वाजता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मंत्री उमेश कट्टी हे भाजपचे मंत्री होते. त्यांनी कर्नाटकाचे दोन तुकडे करा असा प्रस्ताव ठेवला होता. याआधीही कट्टी यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याकडे उत्तर कर्नाटकला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती.
याआधीही कट्टी यांच्या म्हणण्यानुसार बेंगळुरू हे केवळ दक्षिण कर्नाटकातील लोकांसाठी केंद्रीकृत ठिकाण बनले आहे, तर उत्तर कर्नाटकातील लोकांना याचा त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे आम्हाला वेगळ्या राज्याची गरज आहे असा अजेंडा त्यांनी मांडला होता.