पोलिसांनी सायरस मिस्त्रींच्या कारची डेटा चिप जर्मनीला पाठवली, मर्सिडीजकडून मागितला सेफ्टी रिपोर्ट

टाटा समुहाचे  माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला. मर्सिडीज बेन्झ GLC 220 या त्यांच्या कारचा अहमदाबाद-मुंबई हायवेरवर डिव्हायडरला लागून अपघात झाला. या अपघातानंतर मर्सिडीजच्या हाय एण्ड लक्झरी कारच्या सेफ्टीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आता पोलिसांनी मर्सिडीज बेन्झ बनवणाऱ्या जर्मन कंपनीला सेफ्टी फिचर्सबाबत उत्तरं मागितली आहेत, यासाठी पोलिसांनी कारची डेटा चिप जर्मनीला पाठवली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला? अपघातावेळी कारचा स्पीड किती होता? कारमधल्या कोणकोणत्या एअर बॅग्स सुरू होत्या? कारचे ब्रेक आणि दुसरी मशीन काम करत होती का नव्हती? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायरस मिस्त्रींच्या कारचं ECM म्हणजेच Engine Control Module काढून जर्मनीला पाठवलं आहे. ही चिप डिकोड केल्यानंतर SUV बाबत पूर्ण माहिती मिळेल. ही माहिती कंपनी पोलिसांना देईल.

मर्सिडीजच्या या गाडीला ग्लोबल NCAP टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आलं आहे. तसंच कंपनीने त्यांच्या सगळ्या कार योग्य टेस्टिंगनंतरच प्लांटमधून बाहेर काढल्या जातात, असा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी कंपनीला प्लांटमधून गाडी बाहेर येण्याच्या आधीचा रिपोर्ट काय आहे? कारमध्ये कोणता मेकॅनिकल फॉल्ट होता का? असेही प्रश्न विचारले आहेत.

134 किमीच्या वेगाने प्रवास

सायरस मिस्त्री ज्या लक्झरी कारमधून प्रवास करत होते, ती जवळपास 134 किमी प्रती तासाच्या वेगाने जात होती. CCTV मध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे. मिस्त्रींच्या कारने चरोटी चेक पोस्ट रविवारी दुपारी 2 वाजून 21 मिनिटांनी क्रॉस केलं होतं. यानंतर 20 किमी दूर त्यांच्या गाडीचा अपघात झाला, हे अंतर फक्त 9 मिनिटांमध्ये पार करण्यात आलं.

सायरस मिस्त्री रविवारी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी उदवाडाहून निघाले होते आणि अपघात दुपारी 2.30 वाजता झाला. त्यांनी 60-65 किमीचं अंतर 1 तास 4 मिनिटांमध्ये पार केलं. प्रवास करताना ते कुठे थांबले होते का? मध्येच त्यांनी गाडीचा स्पीड वाढवला का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.