तुम्ही कपडे शिवून घेत असाल तर बऱ्याचदा ते अगदी परफेक्टच असतात असं नाही. त्यात टेलरकडून काही ना काही चूक झालेली असते. आपल्याला हवा तसा ड्रेस शिवून मिळालेला नसतो. यावेळी काही जण त्या टेलरकडे जावून ती चूक दुरूस्त करून घेतात. काही टेलर ती दुरूस्त करतात तर काही टेलर तुम्ही सांगितलं तसंच शिवलं आहे, असं सांगून टाळाटाळ करतात. असंच एका ग्राहकाबाबतीत घडलं. पण तो शांत बसला नाही. कपडे शिवण्यात चूक करण्यात चुकलेल्या टेलरकडून त्याने भरपाई घेतली आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील हे प्रकरण. डीएम कॉलनीतील एमपी सिंह यांनी चार वर्षांपूर्वी 4 मे 2018 ला शहरातील सिलको टेलरकडे कुर्ता-पजामा शिवण्यासाठी कपडे दिले होते. एक आठवड्यानंतर म्हणजे 13 मे 2018 रोजी त्यांना हे कपडे शिवून मिळाले. पण ते चुकीच्या पद्धतीने शिवले होते. याबाबत त्यांनी आधी टेलरला सांगितलं पण टेलरने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं.
त्यानंतर ग्राहक आपली तक्रार घेऊन कोर्टाकडे धाव घेतली. त्याने जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागितली. आयोगाने टेलरला नोटीस जारी केली पण तरी टेलर काही आयोगासमोर हजर राहिला नाही. अखेर आयोगाने आपला निर्णय दिला. टेलरला ग्राहकाला चुकीचे कपडे शिवून देणं चांगलंच महागात पडलं आहे. टेलरला मोठा फटका बसला आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार कोर्टाने दोन महिन्यात सिलको टेलरला कपडे शिवण्यासाठी लागणारे 750 रुपये आणि कपड्यांचे 1500 रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच भरपाई म्हणून आणखी 10 हजार रुपये देण्यास सांगतले आहेत. म्हणजे एकूण 12000 रुपये या टेलरला ग्राहकाला द्यावे लागणार आहेत.
यासाठी दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. या ठरलेल्या वेळेत पैसे दिले नाहीत तर त्यावर सात टक्के व्याज लागणार असल्याचंही आयोगाने म्हटलं आहे.