आरोप सिद्ध झाल्यावरच मलिक यांचा राजीनामा : जयंत पाटील

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमिन व्यवहार प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलाय. या प्रकरणी मलिक यांना ईडीकडून अटकही करण्यात आली. सध्या मलिक हे न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येतेय. मलिकांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत भाजपनं जोरदार आंदोलनही केलंय. अशावेळी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

विरोधक नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशन सुरू झाल्यापासून करत आहेत. परंतु मलिक यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणेचा वापर करून कारवाई केली जाते. विरोधक अशा कारवाईनंतर मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत, यावर जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडली.

कोणत्या मंत्र्याला तुरुंगात ठेऊन त्यांचे राजीनामे घ्यायचे हे संयुक्तिक आहे असे मला वाटत नाही. एखादा गुन्हा सिद्ध झाला तर मंत्र्यांचा राजीनामा घेणे समजू शकतो. अनिल देशमुख यांच्याबाबत त्यांनी राजीनामा स्वत:हून दिला. त्यानंतर देशमुखांवर अनेक गुन्हे लावण्यात आले. 95 वेळा त्यांच्या विविध निवास ठिकाणी छापे मारणे सुरू आहे. या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक होत आहेत ही धारणा सर्वांची झाली आहे, असंही जयंत पाटील म्हणाले. नवाब मलिक यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली असती तर ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अटक करण्यात आली. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला हवी होती. त्यामुळे त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणे योग्य नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.