आतिशी दिल्लीच्या नव्या शिक्षणमंत्री,‘आप’ सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद रिक्त

दिल्लीतील ‘आप’ सरकारचे शिक्षण प्रारूप तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आतिशी नव्या शिक्षणमंत्री झाल्या आहेत. तर, पक्षाचे प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी स्वीकारली आहे. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी दोघांना गुरुवारी मंत्रीपदाची शपथ दिली.

अटकेत असलेले मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या राजीनाम्यानंतर केजरीवाल सरकारची फेररचना अनिवार्य झाली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळाची फेररचना करताना उपमुख्यमंत्रीपद मात्र रिक्त ठेवले आहे. यावेळी देखील केजरीवाल यांनी मंत्रीपदाचा भार आपल्या खांद्यावर घेणे टाळले असले, तरी सिसोदियांच्या अनुपस्थितीत दिल्ली सरकारच्या कारभारात आता केजरीवाल यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

केजरीवाल यांचे अत्यंत विश्वासू असलेल्या सिसोदिया यांच्याकडे १८ खात्यांची जबाबदारी होती. त्यातील अर्थ, महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम ही खाती कैलाश गेहलोत यांच्याकडे दिली आहेत. एकाचवेळी महत्त्वाची खाती सांभाळणारे गेहलोत हे केजरीवाल सरकारमधील क्रमांक दोनचे मंत्री बनले आहेत. गेहलोत यांच्याकडे दिल्लीच्या वाहतूक खात्याची जबाबदारी देण्यात आली होती.

दिल्ली विधानसभेत ७० सदस्य आहेत. मंत्रिपदांची संख्या ही सदस्य संख्येच्या १० टक्क्यांपर्यंत मर्यादित असावी लागते. त्यामुळे केजरीवाल सरकारमध्ये ७ मंत्री असून आतिशी आणि भारद्वाज यांचा नव्याने समावेश करावा लागला आहे. भारद्वाज यांच्याकडे पाणीपुरवठा व उद्योग ही खातीही देण्यात आली आहेत. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतलेल्या आतिशी यांनी २०१५ ते २०१७ या काळात शिक्षण प्रारूपाचा आराखडा बनवण्यासाठी सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून काम केले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.