रशियाने केलेल्या मोठय़ा क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या दहा क्षेत्रांतील महत्त्वाच्या पायाभूत सोयी आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षांनी गुरुवारी सांगितले. गेल्या तीन आठवडय़ांत रात्रीच्या वेळी झालेल्या या सर्वात मोठय़ा हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले.
अनेक लोक झोपेत असताना करण्यात आलेला क्षेपणास्त्रांचा भडिमार हा ‘युक्रेनला पुन्हा धमकावण्याचा’ रशियाचा प्रयत्न असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. ‘हे लोक केवळ नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू शकतात. ते केवळ एवढेच करू शकतात’, असे झेलेन्स्की एका ऑनलाइन निवेदनात म्हणाले.
बर्फ वितळल्याने तापमान ९ अंश सेल्सिअसच्या आसपास असताना, या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वीज गेल्याने कीव्हमधील निम्म्या लोकांना उष्णतेशिवाय राहावे लागत आहे. रशियन फौजांच्या ताब्यात असलेल्या दक्षिण युक्रेनमधील झापोरोझिया अणुऊर्जा प्रकल्पातील विजेचे उत्पादन क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे ठप्प झाले आहे.