पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींचा पहिला अंक शनिवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या संसदेमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामाने संपला. रात्री उशीरा पाकिस्तानच्या संसदेमध्ये इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
पाकिस्तानच्या संसदेतील तब्बल १७४ सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात मतदान केल्यामुळे अखेर इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.
अल्पमतात आलेल्या इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव उपसभापती कासीम सुरी यांनी ३ एप्रिल रोजी रद्द केला होता़ इम्रान यांचे सरकार पाडण्याच्या कथित परकीय कटाशी या प्रस्तावाचा संबंध जोडून सुरी यांनी हा निर्णय दिला होता़ त्यानंतर काही मिनिटांतच पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिफारशीनुसार अध्यक्ष आरिफ अल्वी यांनी ‘नॅशनल असेंब्ली’ विसर्जित केली.
या प्रकरणावर सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी सलग पाचव्या दिवशी सुनावणी घेतली़ इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय बंदियाल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने घटनाबाह्य ठरवला़ तसेच ‘नॅशनल असेंब्ली’ विसर्जित करण्याचा निर्णयही घटनाबाह्य ठरवत न्यायालयाने इम्रान यांना धक्का दिला.