पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोनापाठोपाठ आता भारताला आणखी एका जीवघेण्या आजारावरील लस उपलब्ध करून दिली आहे. सीरमने भारतातील पहिली सर्व्हिकल कॅन्सर लस तयार केली आहे. या लशीला सरकारकडूनही आता मंजुरी मिळाली आहे. भारतात तयार झालेली सर्व्हिकल कॅन्सरची ही पहिली लस आहे. डीजीसीआयने या लशीला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे आता लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे.
सर्व्हिकल कॅन्सरचा धोका हा महिलांना असतो. भारतासह अनेक देशांमध्ये महिला सर्व्हिकल कॅन्सरच्या बळी ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत याची संख्या झपाट्याने वाढत आहे. महिलांसाठी जीवघेणा ठरणाऱ्या याच कॅन्सरवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने लस विकसित केली आहे. जी पहिली मेड इन इंडिया सर्व्हिकल कॅन्सर लस आहे. याला सरकारनेही मंजुरी दिल्याची माहिती. सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांनी ट्विटरवर दिली आहे.
आदर पुनावाला यांच्या ट्विटनुसार महिलांमधील सर्व्हिकल कॅन्सरवर उपचारासाठी परवडवणारी अशी भारतातील ही पहिलीच एचपीव्ही लस आहे. या लशीला परवानगी दिल्याबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. तसंच याच वर्षात ही लस लाँच करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
लैंगिक संबंधांमार्फत संक्रमित होणाऱ्या HPV मुळे हा कॅन्सर होतो. याचं निदान अनेकदा पहिल्या स्टेजमध्ये होत नाही. त्याची लक्षणं विकसित होण्यासाठी अनेक वर्षं लागू शकतात. अर्थात काही लक्षणं आधी दिसू लागतात, तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Cervical Cancer ची महत्त्वाची लक्षणं
– लैंगिक संबधांदरम्यान तीव्र वेदना
– स्त्रियांच्या गुप्तांगामधून दुर्गंध येणं
– लैंगिक संबंधांनतर गुप्तांगांमधून रक्तस्राव
– पीरियड्समध्ये अनियमितता आणि अचानक रक्तस्राव होणं
– शौचाला होताना रक्तस्त्राव होणं
– जास्त थकवा
– वजन कमी होणं
– अन्नाची वासना न होणं
– पोटात दुखणं
– लघवी होताना वेदना होणं
-डायरिया
थोडीशी जागरूकता आणि खबरदारी घेतली तर Cervical Cancer पासून बचाव होऊ शकतो. त्याचबरोबर मोलेक्युलर टेस्ट आणि पॅप स्मियर स्क्रीनिंग या चाचण्यांद्वारेही कॅन्सरचं निदान लवकर होऊ शकतं. वेळेवर निदान झाल्यास अनेक महिलांचा जीव वाचू शकतो.आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची महिलांना सवय असते; पण ही सवय जीवावरही बेतू शकते. त्यामुळे कॅन्सरच्या लक्षणांबाबत थोडी जरी शंका आली तरी लगेचच वैद्यकीय सल्ला घ्या.