या जहाजातील स्फोटामुळे अनेक टन प्लास्टिक समुद्रात जमा होत आहे. जहाजातील इंजिन ऑईल समुद्रात मिसळून समुद्री जीवांनाही मोठा धोका निर्माण झालाय.
श्रीलंका आणि भारतीय नौदल काही दिवसांपासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, समुद्रातील लाटा आणि खराब हवामान यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी अडथळे येत आहेत.
या आगीमुळे हे जहाज बुडण्याचा धोका आहे. त्यानंतर त्यातील इंजिन ऑईल आणि इतर केमिकल्स समुद्राच्या किनारपट्टी भागात येऊ नये म्हणून बुडण्याआधी जहाज खोल समुद्रात नेण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
श्रीलंकेच्या सरकारने या भागातील मासेमारीवरही बंदी घातलीय. याशिवाय खाडी परिसरात केमिकल्सचा धोका वाढू नये म्हणून जहाजाला हलवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, जहाज जागेवरच बुडत आहे.
सिंगापूरच्या जहाज कंपनीने या जहाजावरील लिकेजची कर्मचाऱ्यांना माहिती असल्याचं सांगितलंय. त्यामुळे हे कर्मचारी रडारवर आलेत. श्रीलंका पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केलीय. तसेच कसून चौकशी केलीय.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजाला आग लागल्यानंतर कतार आणि भारताने त्यांना जहाज सोडून जाण्यास मनाई केली. त्यानंतर जहाजावरील कॅप्टनला श्रीलंकेने आपल्या समुद्री सीमेत येण्याची परवानगी दिली. त्यामुळे श्रीलंकेन नागरिकांमध्ये असंतोष आहे.
कंटेनरमधील केमिकल लिक झाल्यानेच जहाजाला आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. श्रीलंकन न्यायालयाने जहाजाच्या कॅप्टनसह इतर कर्मचाऱ्यांना सध्या देश सोडून न जाण्याचे आदेश दिलेत.
जगातील सर्वात मोठी फिडर ऑपरेटर कंपनी एक्स-प्रेस फीडर्सचं हे 186 मीटर लांब मालवाहतूक जहाज 1,486 कंटेनर घेऊन जात होतं. यात 25 टन नायट्रिक अॅसिडसह इतर केमिकल्स आणि कॉस्मेटिक्स होते. 15 मे 2021 रोजी हे जहाज भारताच्या हजीरा पोर्टवरुन निघालं होतं.
भारताने 25 मे रोजी आग नियंत्रणासाठी श्रीलंकेच्या नौदलाला मदत म्हणून आयसीजी वैभव, आयसीजी डोर्नियर आणि टग वॉटर लिलीला पाठवलं होतं. प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी भारताने 29 मे रोजी आपलं ‘समुद्र प्रहरी’ हे विशेष जहाजही पाठवलं होतं. आग लागलेल्या जहाजावर 25 लोक होते. त्यांना 21 मे रोजीच वाचवण्यात आलंय. यात भारत, चीन, फिलिपीन आणि रशियाच्या नागरिकांचा समावेश आहे.