डायबेटिस, म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डायबेटिस झालेल्या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण असंतुलित राहते. वेळीच उपचार झाले नाहीत, तर त्याचा परिणाम डोळे, हृदय, किडनी अशा महत्त्वाच्या भागांवरही होतो. त्यामुळेच डायबेटिसच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी डॉक्टरांनी त्यांना पथ्य दिलेलं असतं. यात रोजच्या खाण्यातील बहुतांश पदार्थ कमी करण्याचा सल्ला दिला जातो. यासोबतच असे पदार्थ खाण्यास सांगितले जातात, जे त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवेल. फणस हे फळदेखील याच कामी येतं.
फणसामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतं. सोबतच यात रायबोफ्लेविन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, मँगनीज आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाणही मुबलक असतं. फणसात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाणही कमी असते. एक ते 100 च्या प्रमाणात सांगायचे झाल्यास, फणसाची ग्लायसेमिक इंडेक्स ही सुमारे 50-60 असते. तज्ज्ञांच्या मते, पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस हा डायबेटिसच्या रुग्णांसाठी उत्तम पर्याय आहे.
आज तक च्या वृत्तानुसार मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयातील डाएटिशियन डॉ. जिनल पटेल यांनी सांगितलं, ‘डायबेटिसच्या रुग्णांनी सहसा कच्चा फणस खावा. यामध्ये ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असल्यामुळे, शरीरातील ब्लड-शुगरचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. सोबतच फणसात कॅलरीजही कमी प्रमाणात असतात. अर्थात, फायद्याचा आहे म्हणून भरपूर फणस खाणंही टाळावं.
पण भरपूर प्रमाणात कच्चा फणस खाणं डायबेटिसच्या रुग्णांसाठी धोक्याचंही ठरू शकतं. कच्चा फणस खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेच्या प्रमाणावर लक्ष देणेही गरजेचे आहे. फणसामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर देखील असते, जे आपल्या शरीराच्या दैनंदिन गरजा भागवते.
प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनीदेखील आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर फणसाचे फायदे सांगणारा फोटो शेअर केला आहे.
या व्यक्तींनी खाऊ नये फणस
फणसाचे अनेक फायदे असले, तरी काही व्यक्तींसाठी फणस खाणं हे फायद्याचं नव्हे तर तोट्याचंदेखील ठरू शकतं. याला कारण आहे फणसातील पोटॅशियम.
डॉ. पटेल सांगतात, “फणसात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असतं, जे रक्तात साठून राहण्याची शक्यता असते. या स्थितीला हायपरकेलेमिया म्हणतात. या स्थितीमध्ये शरीरातील नसा, पेशी आणि स्नायू व्यवस्थित काम करू शकत नाहीत.
फणस खाऊ न शकणाऱ्या व्यक्तींमध्ये बर्च पोलन एलर्जी असलेल्या व्यक्तींचा समावेश होतो. सोबतच, ज्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या तयार होतात, त्यांनीही फणस खाणं टाळायला हवं. तसेच कोणत्याही शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर फणस खाणं टाळावं. किडनीचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठीही फणस खाणं तोट्याचे ठरू शकते”