यंदा दिवाळीत पावणेचार लाख कोटींची उलाढाल
देशभरात किरकोळ बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंतच्या कालावधीत आतापर्यंत ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’(कॅट) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने सोमवारी वर्तविला.सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. संपूर्ण देशाचा विचार करता, ‘कॅट’च्या अनुमानानुसार हे व्यवहार ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. आगामी काळातील, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छटपूजा आणि तुळशी विवाह या सणांच्या काळातील उलाढालीचा यात समावेश नाही. या काळात आणखी ५० हजार कोटी रुपयांची भर एकूण उलाढालीत पडेल, असे ‘कॅट’ने म्हटले आहे. संघटनेच्या मते, स्वदेशी उत्पादनांची मागणी आणि विक्री यावेळी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सेमीफायनलच्या सामन्यावर चक्रीवादळ, पावसाचे सावट
बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची, तसेच येत्या चार दिवसांत चक्रीवादळाची निर्मिती होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यात १६ नोव्हेंबरला होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यावर चक्रीवादळाचे सावट असून, त्या दिवशी जोरदार पावसाची शक्यता आहे.चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारणपणे मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसानंतरचा काळ पोषक मानला जातो. त्यानुसार सध्या बंगालच्या उपसागरात असलेल्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीची वाटचाल चक्रीवादळापर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी मोसमी पावसानंतर ऑक्टोबरमध्ये बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.
हलगीच्या तालावर कोल्हापुरात रंगली म्हशी पळवण्याची स्पर्धा! पाडव्याच्या दिवशीचा खास उपक्रम चर्चेत
हलगीचा कडकडाट… घुंगराचा चाळ… शिंगाणा रंग देत त्यावर मोराचा पिसारा लावून नटवलेल्या म्हशीं आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात दिवाळी पाडव्या दिवशी कोल्हापुरातील कसबा बावडा येथे म्हशी पळवण्याची स्पर्धा पार पडली. दिवाळीतल्या पाडव्याला दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे यावर्षी ही स्पर्धा आयोजित केली गेली होती. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा गेली अनेक वर्षे कोल्हापूरने जपली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा ही हा कार्यक्रम एकदम जोशात पार पडला. कसबा बावडा येथील मार्केट परिसरात सकाळ पासूनच नागरिकांनी आपल्या म्हशी घेऊन गर्दी केली होती.
“भाजपाला निवडून द्या, रामलल्लाचं मोफत दर्शन घडवू”; अमित शाहांच्या विधानावर आव्हाडांची तिखट प्रतिक्रिया
अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (१३ नोव्हेंबर) केला आणि मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले. मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शाह बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही ३ डिसेंबरला भाजपाचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल.अमित शाह यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या बातमीचं कार्ड शेअर करत म्हणाले, “या असल्या बातम्या पाहिल्या की माझा विश्वास अजूनच दृढ होतो. भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत, बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय.”
लवकरच सर्व महापालिकांवर प्रशासकीय राजवट
ओबीसी आरक्षण, सदस्यसंख्या वाढ आणि प्रभागरचना ही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याबद्दल अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी राज्यात एकही महानगरपालिका लोकनियुक्त असणार नाही. सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासकराज राहणार आहे.राज्यातील २६ जिल्हा परिषदा, २८९ पंचायत समित्या आणि २५७ नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकाही रखडलेल्या आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्यायालयाच्याच आदेशानुसार ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसींची शास्त्रीय सांख्यिकी माहिती जमा करण्यासाठी समर्पित मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या.
टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी मागितली पियुष गोयल यांची माफी
जगातील आघाडीची मोटार उत्पादक कंपनी टेस्ला नवीन वर्षात म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये भारतातील बाजारपेठेत आगमन होण्याची शक्यता आहे. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. मात्र, टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी पियुष गोयल यांची माफी मागितली आहे.पीयुष गोयल यांनी कॅलिफोर्निया येथील टेस्ला मोटार उत्पादन होत असलेल्या कारखान्याला भेट दिली. पण, प्रकृतीच्या कारणास्तव मस्क यांना पियुष गोयल यांना भेटता आलं नाही. म्हणून मस्क यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवरून पियुष गोयल यांची माफी मागितली आहे.
ऐन दिवाळीत दिल्लीकर ‘झिंगाट’, सणासुदीच्या काळात ५२५ कोटींची मद्यविक्री
सध्या देशभर दिवाळी सण उत्साहात साजरा केला जात आहे. पण ऐन दिवाळीच्या काळात दिल्लीकर मात्र ‘झिंगाट’ असल्याचं समोर आलं आहे. कारण २०२२ च्या तुलनेत यावर्षी जवळपास दुप्पट मद्यविक्री झाल्याचा तपशील समोर आला आहे. दिल्लीकरांनी दिवाळीपूर्वीच दारूचा साठा केल्याचं यातून दिसत आहे.उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १८ दिवसांत तब्बल ३.०४ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली आहे. याची एकूण किंमत तब्बल ५२५.८४ कोटी रुपये इतकी आहे. गेल्यावर्षी दिवाळीपूर्वी याच काळात २.११ कोटी दारूच्या बाटल्यांची विक्री झाली होती.
ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचं निधन
ओबेरॉय समूहाचे मानद अध्यक्ष पृथ्वीराज सिंग ओबेरॉय (पीआरएस ओबेरॉय) यांचं मंगळवारी सकाळी निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पीआरएस ओबेरॉय यांनी भारतातील हॉटेल व्यवसायाला नवी दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. देशात हॉटेल व्यावसायाचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय पीआरएस ओबेरॉय यांना दिलं जातं.
ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे अध्यक्षपद सोडले. २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.
पाकिस्तानचा संशयित ड्रोन पंजाबमध्ये रोखला, सीमा सुरक्षा दलाची मोठी कारवाई!
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील टिंडीवाला गावाजवळ पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत आलेला संशयित ड्रोन रोखला. अंमली पदार्थ तस्करांचे गैरप्रकार थांबवण्यासाठी तत्काळ बीएसएफने कारवाई केली आहे. रविवारीही असाच ड्रोन पाडण्यात आला होता.अंमली पदार्थांच्या तस्करांद्वारे वापरले जाणारे ड्रोन पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेपलीकडून येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रविवारी बीएसएफने पंजाबमधील अमृतसरमधील भरोपाल गावात चीननिर्मित क्वाडकॉप्टर ड्रोन जप्त केले. गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेशासह ३३२३ किमी लांबीच्या भारत-पाकिस्तान सीमेवर रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. तर, सोमवारीही अंमली पदार्थांची तस्करी करणारा संशयित ड्रोन रोखण्यात आला.
किरकोळ महागाई दरात दिलासादायी घसरण, ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्क्यांची चार महिन्यांतील नीचांकी पातळी
मुख्यतः अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे सरलेल्या ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई दराने दिलासादायी घसरण दाखवली. देशाची अर्थव्यवस्था तसेच रिझर्व्ह बँकेसाठीही चिंतेची बाब बनलेला महागाई दर चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे ४.८७ टक्के नोंदवण्यात आला, असे सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले.ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर या आधी म्हणजे सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांच्या तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर होता. चालू वर्षात या दराचा आधीचा नीचांकही ४.८७ टक्के असाच जून महिन्यात नोंदवण्यात आला आहे. टोमॅटोच्या भडकलेल्या किमती आणि त्याचे एकूण भाजीपाला व अन्नधान्य घटकांवरील प्रभाव पाहता ऑगस्टमध्ये ६.८३ टक्के, तर जुलैमध्ये ७.४४ टक्के असे १५ महिन्यांच्या उच्चांकी पातळीला महागाई दर पोहोचला होता. गतवर्षी म्हणजे ऑक्टोबर २०२२ मध्ये महागाई दर ६.७७ टक्के पातळीवर होता.
अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा विक्रम
उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांत २,६८,९२३ विद्यार्थी अमेरिकेत गेले असून हा सर्वकालीन उच्चांक आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.अमेरिकेत शिकणाऱ्या १० लाखांहून अधिक परदेशी विद्यार्थ्यांपैकी भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण २५ टक्क्यांहून अधिक आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी उच्च शिक्षण घेण्यासाठी विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांनी या देशात प्रवास केला आहे, असे ‘ओपन डोअर्स’ अहवालात म्हटले आहे.
भारताचे अंतिम फेरीचे लक्ष्य! उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला उपांत्य सामना; फलंदाजांच्या कामगिरीकडे नजर
सलग नऊ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या यजमान भारतीय संघाचा सामना ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बुधवारी न्यूझीलंड संघाशी होणार आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने आपली विजयी लय कायम राखली आहे आणि उपांत्य सामन्यात त्यांचा प्रयत्न याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा राहील. विश्वचषक भारतात होत असल्याने भारतीय संघाकडून भक्कम कामगिरीची अपेक्षा होती आणि संघानेही निराश न करता सातत्यपूर्ण कामगिरी करताना उपांत्य फेरी गाठली. भारतीय संघ गुणतालिकेत १८ गुणांसह अग्रस्थानी राहिला, तर न्यूझीलंड संघाने निर्णायक क्षणी आपली कामगिरी उंचावत उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. विश्वचषकाच्या गेल्या दोन सत्रांतील उपविजेत्या न्यूूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक भारत करणार नाही.
SD Social Media
9850603590