राजकारणाच्या मैदानातही विराटचीच चर्चा, एस जयशंकर यांनी पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेट दिली खास बॅट
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीची गणना जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स स्टार्समध्ये केली जाते. विराट हा क्रिकेटचा चेहरा बनला आहे. रोनाल्डो आणि मेस्सीनंतर कोहली हा इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा खेळाडू आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट भारताचीही ओळख बनला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांची भेट झाली तेव्हा तिथेही विराट चर्चेत आला.
“भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान अन्…”; गजानन कीर्तिकरांवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली
शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजनान कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. गजानन कीर्तिकरांनी शनिवारी प्रेसनोट प्रसिद्ध करून त्यात रामदास कदमांचा उल्लेख ‘गद्दार’ म्हणून केला होता. याला रामदास कदमांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. गजानन कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे, अशी टीका रामदास कदमांनी केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.रामदास कदम म्हणाले, “दिवाळीत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये फटाके फुटत आहेत. हे पक्षासाठी भूषणावह नाही. कीर्तिकरांचं वय ८० ते ८५ वर्षे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी कीर्तिकरांनी चर्चा करायला हवी होती. पण, वय झाल्याने कीर्तिकर भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना डॉक्टरांची गरज आहे. कारण, कुठलाच वरिष्ठ नेता प्रेसनोट काढत नसतो.”
घरावरील हल्ल्याबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांचं मोठं वक्तव्य
मनोज जरांगे पाटलांना दिलेला शब्द राज्य सरकारने पाळला नाही. राज्य सरकारने जरांगे यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली होती. परंतु, दिलेल्या मुदतीत राज्य सरकारने उचित कार्यवाही केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. एका बाजूला जरांगे यांचं उपोषण चालू असताना दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक झाले होते. या काळात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. अशातच बीडमध्ये आंदोलनाने अधिक हिंसक वळण घेतलं होतं.आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, तो हल्ला काही समाजकंटकांनी केला होता. मराठा समाजाचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. हा प्रकार चुकीचा आहे. माझं घर बीड शहरात आहे. शहरात इतर नेत्यांचीदेखील घरं आहेत. बीडमध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकानांची तोडफोड झाली. त्या व्यापाऱ्यांनी आणि सगळ्याच नेत्यांनी सांगितलं की, या हल्ल्याशी आंदोलकांचा काही संबंध नाही. मीदेखील प्रामाणिकपणे हेच सांगेन की त्या हल्याशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही.
अमित शाह अन् अजित पवारांची दिल्लीत भेट
डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचं समाजमाध्यमांद्वारे जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १० नोव्हेंबर ) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यानंतर लवकर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.जयंत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांना भेटतात, ही चांगली गोष्ट आहे. मला खात्रीय की राज्याच्या हिताचेच प्रश्न अमित शाहांच्यासमोर ते मांडत असतील. राज्यातील ज्वलंत प्रश्न लवकर निकाली काढण्यावर चर्चा केली असेल, तर त्याचं स्वागत करतो.”
रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा ३२ वर्षांचा संसार संपुष्टात, घटस्फोटाचा निर्णय
रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा ३२ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. आमच्या मुलांसाठी जे काही चांगलं आहे ते आम्ही करत राहू असं म्हणत लग्नाच्या ३२ वर्षानंतर वेगळे होत असल्याचा निर्णय या दोघांनी जाहीर केला आहे.
सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी, पंतप्रधान कार्यालयाची अवहेलना पडली महागात
ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांची गृहमंत्री पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हा निर्णय घेतला आहे. लंडनच्या ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात सुएला ब्रेव्हरमन यांनी एक लेख लिहिला होता. त्यात लंडनची पोलीस यंत्रणा पॅलेस्टाईन धार्जिणी आहे असा आरोप केला होता. तसंच येथील यंत्रणेला कायदा सुव्यवस्थेची चिंता नाही असंही लेखात म्हटलं होतं. त्यामुळेच आता त्यांना गृहमंत्रीपदावरुन हाकलण्यात आलं आहे.
श्रीलंकेच्या माजी कर्णधाराचा जय शाहांवर गंभीर आरोप
श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जून रणतुंगा यांनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत, असा मोठा आरोप अर्जून रणतुंगा यांनी केला आहे. २०२३ च्या क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंकेच्या टीमच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर रणतुंगा यांनी ही टीका केली आहे.श्रीलंकेतील डेली मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अर्जून रणतुंगा म्हणाले, “श्रीलंका क्रिकेटचे अधिकारी आणि जय शाह यांच्या संबंधांमुळे बीसीसीआयला असं वाटतं की, ते श्रीलंकेचं क्रिकेट नियंत्रित करू शकतात. जय शाह श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त करत आहेत. जय शाह यांच्या दबावामुळे श्रीलंकेचं क्रिकेट उद्ध्वस्त होत आहे.”
भारतातील शहरांची धुळधाण! जगातील सर्वांत प्रदूषित शहरांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर
देशभर दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांकडूनही दिवाळी साजरी केली जातेय. एकीकडे देशात वायू प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरुपात फटाके फोडण्याला परवानगी दिली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला झुगारत देशभर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यामुळे देशातील तीन शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून गणली गेली आहेत. यामध्ये पहिल्या नंबरवर देशाची राजाधानी दिल्लीचा क्रमांक लागतो. स्वीस ग्रुप IQAir ने हा अहवाल दिला आहे.
रोहित ब्रिगेडने भारताला दिली दिवाळी भेट
विश्वचषक २०२३ च्या ४५व्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गट फेरीतील आपले सर्व सामने जिंकले. भारताने विश्वचषकातील सर्व संघांचा पराभव केला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने ५० षटकांत चार विकेट्स गमावत ४१० धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ ४७.४ षटकांत सर्वबाद २५० धावांवर आटोपला. टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांना विजयाची भेट दिली. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले.
मोदी सरकारकडून नेपाळला पुन्हा मदतीचा हात, पतंजली आयुर्वेद भूकंपग्रस्तांना देणार २० मेट्रिक टन तांदूळ दान
गेल्या काही दिवसांपूर्वीच भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे तिथे बरेच नुकसान झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारने नेपाळला आपले शेजारी कर्तव्याचे पालन करत मदत करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारने बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, परंतु आता सरकारने भारतातील स्वदेशी कंपनी पतंजलीला या निर्यात बंदीतून एकदाच सूट दिली आहे. सरकारने पतंजली आयुर्वेदला नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी दान म्हणून २० मेट्रिक टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्याची परवानगी दिली आहे.
दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान शेअर बाजारात चौफेर खरेदी, सेन्सेक्स-निफ्टी तेजीत
देशांतर्गत शेअर बाजाराने दिवाळीत नवीन वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. विशेष मुहूर्ताच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक तेजीत राहिले होते. एक तासाचा विशेष व्यवहार संपल्यानंतर बाजार ३५० हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला होता.शेअर बाजारासाठी दिवाळी विशेष मानली जाते. दिवाळीच्या दिवशी देशातील व्यापारी वर्ग संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा करतात. शेअर बाजारासाठीही महत्त्व वाढते, कारण प्रत्येक वेळी दिवाळी ही बाजारात नवीन वर्षाची सुरुवात होते. विक्रम संवत आणि संवत २०८० नुसार बाजारपेठा आणि व्यावसायिकांचे हे नवीन वर्ष दिवाळीपासून सुरू झाले आहे.
नामदेव जाधव जिजाऊंचे वंशज नसल्याचा राजे लखोजीराव जाधव यांच्या वंशजांचा दावा
नामदेव जाधव यांनी आपण जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा त्यांच्या फेसबुक पेज आणि X (पूर्वीचे ट्विटर) यावर केला आहे. तसंच काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली होती. आता राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज गोपाल भगवान जाधव यांनी आमदार रोहित पवार यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. नामदेव जाधव हे जिजाऊंचे वंशज नाहीत ते तोतया आहेत असा उल्लेख या पत्रात केला आहे.
२०० गुणांच्या परीक्षेत २०० पेक्षा अधिक गुण! सुधारित निकाल लावण्याची ‘महाज्योती’वर नामुष्की
महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (महाज्योती) राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेच्या (एमपीएससी) प्रशिक्षण प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. ही परिक्षा २०० गुणांची असताना अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असून लवकरच सुधारित निकाल जाहीर केला जाईल, असे ‘महाज्योती’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.२५ आणि २६ ऑक्टोबर रोजी एमपीएससी प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी एकूण ८ सत्रांमध्ये चाळणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी एकूण ३९ हजार ७८६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल शनिवारी ‘महाज्योती’च्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. निकाल जाहीर करण्याचे काम एका संस्थेला देण्यात आले होते. मात्र निकालात गोंधळ झाल्यानंतर हा निकाल संकेतस्थळावरून हटविण्यात आला आहे. सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध केला जाईल. त्यावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागविण्यात येतील व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निकालाबाबत कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असा खुलासा ‘महाज्योती’मार्फत काढलेल्या पत्रकात केला आहे.
SD Social Media
9850603590