पंतप्रधान मोदींकडून सैनिकांबरोबर दिवाळी साजरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी सैनिकांच्या पराक्रमाचं कौतुक केलं. “प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आठवण येते,” अशी भावना मोदींनी व्यक्त केली. तसेच जेथे सैनिक तेथेच माझा सण असंही नमूद केलं. ते रविवारी (१२ नोव्हेंबर) हिमाचल प्रदेशमधील लेपचा येथे सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करताना बोलत होते.नरेंद्र मोदी म्हणाले, “भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा हा उद्घोष आहे. दिवाळी हा पृथ्वीवरील पवित्र सण आहे. हा फार मोठा योगायोग आहे. माझ्यासाठी हा क्षण समाधान आणि आनंद देणारा आहे. हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासीयांना दिवाळीचा नवा प्रकाश देईल, असा मला विश्वास आहे.”
भारताने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, श्रेयस आणि राहुल यांच्या शतकाच्या जोरावर उभारला धावांचा डोंगर
भारतीय संघाने वर्ल़्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड रचल्याचे पाहायला मिळाले. कारण वर्ल्ड कपमध्ये भारताला अशी कामगिरी यापूर्वी कधीही करता आली नव्हती. या सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी दमदार अर्धशतकं झळकावली खरी, पण कोणालाही शतक झळकावता आले नव्हते. या सामन्यात भारताच्या पहिल्या चारही खेळाडूंनी अर्धशतकापेक्षा जास्त धावा करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंत ही कामगिरी कोणालाही करता आली नव्हती. श्रेयस आणि लोकेश राहुल यांच्या शतकाच्या जोरावर भारताने नेदरलँड्सच्या सामन्यात ४१० धावांचा डोंगर उभारला. श्रेयस अय्यरने या सामन्यात ९४ चेंडूंत नाबाद १२८ धावांची खेळी साकारली, राहुलने यावेळी ९८ चेंडूंत १०२ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
देवेंद्र फडणवीस की अजित पवार, कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा कोण करणार?
आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी विठ्ठलाची शासकीय पूजा करतात. तर कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही शासकीय पूजा केली जाते. गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा केली होती. परंतु, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यावा असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला आहे. तसेच कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकीनिमित्त विठ्ठलाची पूजा करणार असा प्रश्न राज्यातल्या जनतेलाही पडला आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंदिर समितीसमोर असलेल्या पेचावर भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोणी पूजा करावी, याबद्दल मला काही माहिती नाही. माझ्या मनात आणि माझ्या ओठांवर नेहमी ‘राम कृष्ण हरी’ हेच शब्द असतात. मी ‘राम कृष्ण हरी’चा जप करणारी आहे. आपण सगळे वारकरी आहोत, सगळे शेतकरी आहोत. आपलं फक्त ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा’ एवढंच असतं.
“भारताच्या एजंटांनी निज्जरची हत्या केली, आमच्या विरोधानंतर…” कॅनेडियन पंतप्रधानांचा संताप
खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध ताणले गेले आहेत. या हत्येवरून कॅनडाने भारतावर वेगवेगळे आरोप केल्यानंतर उभय देशांमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडा सरकारने तिथल्या भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ भारतानेही स्पष्ट शब्दांत कॅनडा सरकारला ठणकावलं आणि भारतातल्या कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. तेव्हापासून दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी याप्रकरणी भारताविषयी आणखी एक वक्तव्य केलं आहे.
उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन बोगद्याचा ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला, ३६ मजूर अडकले
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या एका निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. तब्बल ३६ मजूर बोगद्यात अडकल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नाही. दरम्यान, प्रशासनाने या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली आहे. भूस्खलनामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे.
शरद पवारांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दाखल्यावर ओबीसी नोंद असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. मात्र, हा दाखला खोटा असल्याचे माहिती शरद पवारांचे समर्थक विकास पासलकर यांनी दिली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.सोशळ मिडीयातील ओबीसी दाखला प्रकरणावर बोलताना सुळे म्हणाल्या की, साहेब जेव्हा दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी हे सर्व हास्यास्पद असून पवार साहेबांवर आरोप करणाऱ्यांचा हा बालिशपणा आहे. आजकाल खोटी सर्टिफिकेट हे मार्केटमध्ये सर्रास मिळतात अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली.
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, उत्तर प्रदेशातून ISIS च्या सहा संशयितांना अटक
उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (११ नोव्हेंबर) राज्यातील विविध भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे. रकीब इनाम, नावेद सिद्दीकी, मोहम्मद नोमान आणि मोहम्मद नाझीम अशी या सहापैकी चौघांची नावे आहेत. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी अलिगढ विद्यापीठाच्या स्टुडंट्स ऑफ अलिगढ युनिव्हर्सिटी (एसएएमयू) या विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत. ते सर्वजण एसएएमयू बैठकीद्वारे एकमेकांना ओळखत होते.उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित आरोपी देशात मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची योजना आखत होते. यूपी एटीएसने सहा जणांना अटक केल्याने अलीगढ विद्यापीठात खळबळ उडाली आहे. SAMU ही ISIS मध्ये नवीन लोकांची भरती करणारी शाखा बनली आहे, असा दावाही दहशतवादविरोधी पथकाने केला.
‘क्रिप्टोकरन्सी’संदर्भात सुनावणीस न्यायालयाचा नकार
कूटचलन (क्रिप्टोकरन्सी) विनिमयाद्वारे व्यापारावरील नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या निर्मिताबाबत केंद्र आणि अन्य संबंधितांना आदेश देण्याच्या मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ‘कूटचलन’ हे डिजिटल किंवा आभासी चलन आहे. मध्यवर्ती बँकेशी संबंध न ठेवता त्याद्वारे स्वतंत्र व्यवहार केले जातात.
गाझातील मुख्य रुग्णालयाजवळ तीव्र संघर्ष; अर्भकासह पाच रुग्णांचा मृत्यू
इस्रायली लष्कराने गाझाच्या सर्वात मोठय़ा शिफा या रुग्णालयाला वेढा घातला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, यामुळे अखेरच्या विद्युत जनित्रातील इंधन संपल्याने मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकासह पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिफा रुग्णालयास ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी मुख्य केंद्र बनवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे दहशतवादी तेथील नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत आहेत. तसेच या रुग्णालयाखाली त्यांनी भुयारी अड्डे (बंकर) केले आहेत, असेही इस्रायलचे म्हणणे आहे.
सलमानचा ‘टायगर ३’ प्रदर्शनाच्या दिवशीच झाला ऑनलाईन लीक
सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित चित्रपट टायगर ३ आज (१२ नोव्हेबरला) प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या आधीच अॕडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने कोट्यावधींची कमाई केली आहे.‘टायगर ३’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ऑनलाइन साइट्सवर लीक झाला आहे. तमिळरॉकर्स, टेलिग्राम, मूवीरुलज मुव्हिजरुल्झ आणि इतर पायरसी साइट्सवर टायगर ३ लीक करण्यात आला आहे. हा चित्रपट ऑनलाइन बघण्याबरोबरच डाऊनलोडही करता येणं शक्य आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर याचा थोडा फार परिणाम होणार असल्याने निर्मात्यांची चिंता वाढली आहे.
SD Social Media
9850603590