अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, प्रशांत दामले ठरले विजयी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुका हा गेले काही दिवस चर्चेचा विषय होता. या निवडणुकीसाठी रविवारी (१६ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर आणि गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर या केंद्रांवर मतदान झाले. तर काल रात्री मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले विजयी झाले आहेत.रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी सुरू होती. अखेर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबई मध्यवर्ती शाखेतील १० जागांपैकी ८ जागांवर प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’च्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या ‘आपलं पॅनल’चे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने विजयी ठरले आहेत. तर मुंबई उपनगरांत दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या असून दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, हायकोर्टाचा ‘शिंदे सरकार’च्या बाजूने कौल
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या 236 वरून 227 करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजीच्या अध्यादेशाला व त्यानंतर पारित झालेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शुक्रे व न्यायमूर्ती चंदवाणी यांच्या खंडपीठाने फेटाळल्या. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे निकाल जाहीर करण्यात आला. सविस्तर निकालाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. महाविकासआघाडी सरकार असताना मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या 227 वरून 236 करण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने अध्यादेश काढून ही संख्या पुन्हा एकदा 227 केली, याविरोधात ठाकरे गटाकडून कोर्टात धाव घेण्यात आली होती.
महाराष्ट्र भूषण सोहळा : मृतांची संख्या 12वर, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी सुरक्षेत वाढ
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा रविवारी खारघर इथं पार पडला. डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेल्या समाजकार्याच्या योगदानासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र या कार्यक्रमावेळी उष्माघातामुळे श्री सेवकांचा मृत्यू झाल्यानं महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलंय. श्री सेवकांच्या मृत्यूमुळे श्री परिवारावर शोककळा पसरली असून अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर करण्यात आलेली सजावटही काढण्यात आलीय. दरम्यान, या प्रकारानंतर राज्यातलं वातावरणही तापलं असून राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.विरोधकांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनावर प्रश्न उपस्थित करताना सरकारला जाब विचारला आहे. तर सोशल मीडियावरही या प्रकरणी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून डोमेस्टिक क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ
बीसीसीआय भारतीय क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मागील काळात अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. महिला प्रीमियर लीग सुरु करण्यासह यंदाच्या आयपीएल सारख्या जगप्रसिद्ध लीगमध्ये देखील मोठे बदल करत असताना आता डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी जय शहा यांनी याबाबत ट्विट करत मोठी घोषणा केली आहे.बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिस रकमेत वाढ करत असल्याचे सांगितले. देशांतर्गत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला असून याअंतर्गत रणजी ट्रॉफी , इराणी ट्रॉफी , दुलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, वरिष्ठ महिला वन डे ट्रॉफी, वरिष्ठ महिला ट्वेंटी-20 ट्रॉफी इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे.
अजित पवार भाजपात येणार आहेत का? केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले, “फक्त दादाच नाही, तर..”
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अजित पवार भारतीय जनता पक्षात जातील किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात जातील अशा अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. अलिकडेच अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याचं बोललं जात आहे. वेगवेगळे नेते यावर आपल्या प्रतिक्रिया देत असताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांना देखील याबाबत विचारण्यात आल्यावर कराड म्हणाले की, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे टीव्ही ९ मराठीशी बातचित करत असताना त्यांना सवाल करण्यात आला की, अजित पवार भाजपात येणार असल्याच्या चर्चा आहेत, यात काय सत्य आहे? यावर भागवत कराड म्हणाले की, फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. तसेच राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे १५ आमदार आहेत, त्यांच्यातही अस्वस्थता आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृत श्री सदस्यांप्रती अमित शाहांचे ट्वीट; म्हणाले, “माझे मन जड…”
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्यशासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. रणरणत्या उन्हात या श्री सदस्यांनी आप्पासाहेबांप्रती प्रेमभावना व्यक्त केल्या. परंतु, उष्माघात झाल्याने तब्बल ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या कार्यक्रमाला गालबोट लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री यांनी मृत श्री सदस्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी मराठीत ट्वीट करून आदरांजली वाहिली.
देशभरात करोनामुळे २४ जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांचाही आकडा वाढला
देशात करोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. करोना संसर्गावर वेळीच आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. करोना प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीनंतरही करोनाचे आस्ते कदम सुरूच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार १११ रुग्णांची वाढ झाली आहे. तर, एकूण २४ बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. करोनाच्या नव्या बाधितांसह मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने आरोग्य खात्यासमोरील आव्हाने अधिक वाढले आहे.गेल्या २४ तासांत देशात करोनाचे ९ हजार १११ नवे रुग्ण सापडले असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजार ३१३ झाली आहे. तर, ६ हजार ३१३ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
पक्ष विस्तारानंतर बीआरएसचं मिशन ‘महाराष्ट्र’
काही दिवसांपूर्वीच तेलंगणातील तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचा विस्तार करत भारत राष्ट्र समिती केली आहे. पक्षाचं नाव बदलून बीआरएसने राष्ट्रीय राजकारणात उडी घेतली आहे. पक्ष विस्तारानंतर बीआरएसने महाराष्ट्र राज्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. राज्याच्या राजकरणात बीआरएसने नांदेड मधून एन्ट्री केली आहे.
‘श्री’ सेवकांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेब धर्माधिकारींनी व्यक्त केलं दु:ख; राजकारण न करण्याचंही केलं आवाहन!
रविवारी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेबांचे अनुयायी आले होते. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेबाबत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी निवेदन जारी करत, या घटनेचं कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे.
SD Social Media
9850 60 3590