धडगाव तालुक्यातील आदिवासी महिलेवरील बलात्कार प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याने पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. धडगाव पोलीस निरीक्षकासह सहा जणांची बदली करण्यात आली आहे.
धडगावच्या खडक्या येथे १ ऑगस्टला महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला होता. मात्र, पोलिसांनी सुरूवातीला आत्महत्येची नोंद केल्याने न्यायाच्या मागणीसाठी वडिलांनी मृतदेह दीड महिना मीठाच्या खड्डय़ात पुरून ठेवला. हे प्रकरण ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा नोंदवून कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह गुरुवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणला. शवविच्छेदनाचा अहवाल प्रलंबित आहे. अखेर दीड महिन्यानंतर कुटुंबीयांनी आदिवासी रितीरिवाजाप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार केला.