पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे मेट्रोचे लवकरच उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठड्यात हा दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. यासह आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उदघाटन तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजनाचे कार्यक्रम या दौऱ्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या महिन्यात पुणे दौरा स्थगित करण्यात आला होता. पुणे महापालिकेची 14 मार्चला मुदत संपत आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या हस्ते मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर फडणवीसांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी मोदींच्या हस्तेच पुणे मेट्रोचं उद्घाटन होईल असं फडणवीस म्हणाले होते. आता मोदी येणार असल्यामुळे भाजपची अजित पवारांवरील कुरघोडी स्पष्ट झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यातील मेट्रोचा पाहणी दौरा आयोजित केला होता. मेट्रोची संपूर्ण माहिती त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. स्थानिक नेते, प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेप नाही, मात्र पुण्याचे एवढे आमदार, खासदार, महापौर कुणीही तिथे नाही आणि पवारच मेट्रोची ट्रायल घेण्यासाठी कसे काय जातात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. पुण्यातील मेट्रो प्रकल्पात फेरफटका मारून शरद पवार यांचा मेट्रो प्रकल्पाचे श्रेय लाटायचे होते का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

अजित पावारांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विरोध हाही गाजला होता. त्यानंतर पुण्यातल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्याच हस्ते होणार असा पवित्रा फडणवीसांनी घेतला होते. पुण्यातल्या मेट्रोवरून भाजप आणि राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई रंगताना दिसून येत आहे. आता पंतप्रधान मोदीच मेट्रोच्या उद्घाटनाला येणार असल्याचे भाजपने टाकलेला डाव यशस्वी होताना दिसतोय. यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मेट्रोच्या उद्घाटनावरून आणि श्रेयवादावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.