सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोना प्रतिबंधक असलेल्या कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत आरोग्य मंत्रालयाला विनंती केली आहे. कंपनीने आपल्या विनंतीमध्ये म्हटले आहे की, कोवोवॅक्सच्या निर्यातीला परवानगी न दिल्यास येत्या डिसेंबरपर्यंत जवळपास एक कोटी डोस मुदत संपून ते खराब होतील. याचा मोठा फटका कंपनीला बसेल, त्यामुळे केंद्र सरकारने लसीच्या निर्यातीला परवानगी द्यावी.
दरम्यान सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. अद्याप तरी लसीकरण हाच कोरोनावर मात करण्याचा सर्वात उपयुक्त मार्ग आहे. त्यामुळे सध्या विविध कोरोना प्रतिबंधक लसींच्या मागणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक देशांनी परदेशातील लस निर्मिती कंपन्यांसोबत करार करून, त्यांच्या लसी खरेदी केल्या आहेत. इंडोनेशियाने देखील कोवोवॅक्स या लसीसाठी असाच करार सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत नुकताच केला आहे. मात्र भारताने कोवोवॅक्स लसीच्या निर्यातीसाठी बंदी घातल्याने ते इंडोनेशियाला लस पुरवठा करण्यास असमर्थ आहेत. भारत सरकारकडे निर्यातीसाठी परवानगी मागताना कंपनीने याचा देखील उल्लेख केला आहे. जर येणाऱ्या काळात लसीच्या निर्यातीला परवानगी न मिळाल्यास कोट्यावधी डोस वाया जाणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्या कंपनीकडे पुरेशाप्रमाणात कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध आहे. देशाची गरज भागवून देखील कोट्यावधी लसींचे डोस कंपनीकडे शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे कोवोवॅक्स डोसच्या निर्यातीची परवानगी कंपनीला द्यावी अशी मागणी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून केंद्राकडे करण्यात आली आहे. आता केंद्र सरकार कंपनीच्या या मागणीवर काय निर्णय घेणार हे पाहाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.