एअर इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी होती. ती तोट्यात गेली तिला विकण्याचा निर्णय केंद्राने घेतला. आपल्या एसटीला 60 वर्षांची परंपरा आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु एसटी महामंडळ तोट्यात असताना देखील कोणी खासगीकरणाचा साधा विचार देखील केला नाही. राज्य सरकार कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे. मात्र गेल्या साहा – सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असून मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ते आज कार्तिकी एकादशीनिम्मित आयोजित पंढरपुरातील विठ्ठलाच्या पुजेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येक वेळी माझेच खरे अशी भूमीका घेऊन चालत नाही. राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची जाणीव आहे. त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न सरकार करेल. राज्य सरकारने तोट्यात असलेल्या महामंडळाला दीड हजार कोटींची मदत केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. आधीच तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला दिवसाकाठी 12 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा. तुटेपर्यंत ताणण्यात काहीही अर्थ नसतो हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे.
गेल्या काही दिवसांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येंच्या घटनेत वाढ झाली आहे. आर्थिक विवंचनेला कंटाळून आतापर्यंत जवळपास 37 एसटी चालकांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आत्महत्या करू नये असे पवार यांनी म्हटले आहे. सरकार जर दोन पाऊले मागे येत असेल, तर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काही बाबींमध्ये माघार घेऊन सरकारला सहकार्य करावे असे पवार यावेळी म्हणाले आहेत.